इम्फाळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर राज्याचा दौरा करणार आहेत. इम्फाल आणि चुराचांदपूर या दोन्ही ठिकाणी ते दोन वेगवेगळ्या सभांना संबोधित करतील. या कार्यक्रमात अनेक कार्यक्रमांचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मणिपूरमध्ये मतैई आणि कुकी समाजात मे 2023 साली झालेल्या हिंसाचारानंतर हा मोदींचा पहिला दौरा आहे. तर पंतप्रधान झाल्यापासूनचा मणिपूरचा हा आठवा दौरा असेल. यापूर्वी 2014 ते 2022 या काळात ते सात वेळा मणिपूर राज्यात गेलेले आहेत.

मणिपूर हिंसाचारानंतर विरोधक सातत्यानं पंतप्रधान मणिपूरचा दौरा का करत नाहीत, असा सवाल विचारत होते. आता मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं विरोधकांनी या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. मणिपूरची समस्या गेल्या अनेक काळापासून सुरु आहे. चांगली बाब आहे की आता पंतप्रधान मणिपूरचा दौरा करतायेत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिलीय.
8500 कोटींच्या प्रकल्पांचं करणार भूमिपूजन
पंतप्रधान शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास चुराचांदपुरात जाणार आहेत. शहरातील मुख्य मैदानात होणाऱ्या सभेत ते 7300 कोटींच्या कामांचं भूमिपूजन करतील आणि जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास इम्फाळच्या ऐतिहासिक कंगला किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे 1200 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाॉन मोदींच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणीही ते जनतेला संबोधित करतील.
मोदींच्या दौऱ्याच्या टायमिंगची चर्चा
नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारवर सध्या मतचोरी आरोपांवरुन विरोधकांनी रान उठवलेलं आहे. तसचं मणिपूरमध्ये मोदींनी भेट दिली नसल्याचा मुद्दाही सातत्यानं विरोधकांनी लावून धरलेला आहे. अशा स्थितीत नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्याला विशेष महत्त्व असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायेत. पंतप्रधानांच्या विरोधात कोमताही नरेटिव्ह सेट होऊ नये, याची काळजी घेण्यात येते आहे. लोकनेते अशी प्रतिमा जपण्यासाठी मोदींच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.











