पुणे – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे आई-वडील आता पोलिसांच्या टार्गेटवर आहेत. वडिलांकडून ड्रायव्हरचं अपहरण झाल्याचा तर आईविरोधातही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूजाच्या आईने पोलिसांना घरात येण्यापासून रोखले, आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याने गुन्हा नोंदवण्यात आलाय.
पूजा खेडकरच्या पुण्यातल्या घरी पोलिसांकडून चौकशी करण्यात आलीय. पूजाचा मोबाईल फोनही पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. नवी मुंबईतील ऐरोलीत कारला ट्रक धडकल्यानंतर ट्रक ड्रायव्हरचं अपहरण करून पुण्यात पूजा खेडकरच्या घरी नेल्याचा आरोप आहे
दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे यांनी केलं होतं ड्रायव्हरचं अपहरण, अशी नवी मुंबई पोलिसांनी माहिती दिलीय.

खेडकर कुटुंबाचे वादग्रस्त प्रताप
वादग्रस्त खेडकर कुटुंबियांच्या प्रतापामुळं पोलिसांच्याही नाकानऊ आलेत. नव्या अपहरण प्रकरणात चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना कसरत करावी लागली. चक्क खेडकर राहत असेलल्या बंगल्याच्या गेटवर चढून आत प्रवेश करावा लागला. अर्थात पोलिसांना ना दिलीप खेडकर मिळून आले ना त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर. दरम्यान, खेडकर कुटुंबियांच्या एका केअरटेकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर याशिवाय पूजा खेडकरचा मोबाईल जप्त करण्यात आलाय.
नेमकं काय आहे अपहरणनाट्य?
शनिवारी नवी मुंबईत घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणाने मोठी खळबळ उडाली होती. मात्र अपहरण झालेला युवक बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या पुण्यातील बंगल्यात आढळून आला. त्यामुळं या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली
नवी मुंबईत सिमेंट मिक्सर ट्रक आणिलँड क्रूझरचा 13 सप्टेंबरला अपघात झाला. अपघातानंतर लँड क्रूझरमधील दोघांचा ट्रकमधील चालक, हेल्परशी वाद झाला. लँड क्रूझरमधील दोघांनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं. ट्रक चालकाकडून या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. तपासदरम्यान MH 12 RP 5000
लँड क्रूझर पूजा खेडकरच्या पुण्यातील बंगल्यासमोर आढळून आली. पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवीपणा केला, अंगावर कुत्रे सोडले. काही वेळाने प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या मार्गाने पळून गेले
खेडकर कुटुंबाची अरेरावी सुरुच
सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, तपासात सहकार्य केलं नसल्याप्रकरणी पोलिसांनी खेडकर कुटुंबियांच्या बंगल्यावर नोटीस लावली. धक्कादायक बाब म्हणजे ही नोटीसही खेडकर कुटुंबियांकडून फाडण्यात आली
खेडकर कुटुंबावर कारवाई का नाही?
विशेष खेडकर कुटुंबीय वादात सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. आधी लेक पूजा खेडकर, मग आई मनोरमा आणि आता वडील दिलीप खेडकर अडचणीत आलेत. आधीही या कुटुंबानं पोलिसांच्या नाकात दम करुन ठेवली होता. दमदाटीप्रकरणी मनोरमा खेडकरांना जेलची हवा खावी लागली होती. मात्र त्यानंतरही हे कुटुंब सुधारण्याचं नाव घेत नाहीय. त्यामुळं या खेडकर कुटुंबावर कुणाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय











