गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संशयित नर्तिका पूजा गायकवाडला पोलिस कोठडीनंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे येणारा संपूर्ण नवरात्र उत्सव तिला तुरुंगातच काढावा लागणार आहे. लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी नर्तिका पूजा गायकवाडसोबत असलेल्या प्रेमसंबंधातील तणावातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले होते.
पूजा गायकवाड जेल की बेल?
न्यायालयीन कोठडीमुळे पूजाची चौकशी आता तुरुंगातूनच केली जाणार आहे. त्यामुळे नवरात्राचा संपूर्ण काळ तिला तुरुंगात काढावा लागणार आहे. पुढील सुनावणीदरम्यान तिच्या जामिनावर निर्णय होईल. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला अधिक गती दिली आहे. त्यामुळे पूजा गायकवाडला जेल की बेल असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रकरणात नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी 9 सप्टेंबर रोजी सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासुर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमाच्या नादात हे पाऊल उचलले होते. आता खरंतर या प्रकरणात सातत्याने नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. गोविंद बर्गे यांनी वैराग इथं येऊन पूजा गायकवाडच्या घरासमोर एका कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पारगाव येथील कला केंद्रातील नर्तिक पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली होती.
‘ते’ पिस्तूल गोविंद बर्गेंचं नाही, पोलिसांचा दावा
पोलिसांनी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली त्यावेळी वापरलेल्या पिस्तुलीबद्दल नवीन दावा केला आहे. गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून ज्या पिस्तुलीनं आत्महत्या केली, ते पिस्तूल गोविंद बर्गेंचं नसल्याचं आलं समोर आहे. गोविंद बर्गे यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे पिस्तूल नसल्याचं तपासात उघड झालं आहे. सदर पिस्तूल हे बर्गे यांनी दुसऱ्याकडून खरेदी केलं असावं असा दावा पोलिसांनी केला आहे. या पिस्तुलीचा त्याचा पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे सुरू आहे.
पूजा गायकवाडचं ब्लॅकमेलिंग आणि आत्महत्या
कोठडी संपल्यानंतर पूजाला आज शनिवारी बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ज्या दिवशी बर्गेंनी आत्महत्या केली, त्या दिवशी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामध्ये फोनवर काय संवाद झाला हे तपासायचं आहे. यासाठी पूजा गायकवाडच्या फोनचा सीडीआर काढणे गरजेचं आहे आणि त्याचं विश्लेषण करणं आहे. असे पोलिसांचे मत आहे.











