मुंबई- आर्टिफिशल इंटिलिजन्सची म्हणजेच एआयची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. चॅट जीपीटीवर घिबली फोटोचा ट्रेंड आता मागे पडलाय. सध्या जेमिनीवरच्या फॅशनेबल फोटोंचा आणि नॅनो बनाना थ्रीडी मॉडेल्सचा ट्रेंड जोरात आहे. पण या सगळ्या ट्रेंडच्या गोंधळात दररोज अब्जावधी प्रश्न चॅट जीपीटीसारख्या एआय असिस्टंटना विचारले जातात.
असाच एक प्रश्न 16 वर्षाच्या मुलानं चॅटजीपीटीला विचारला त्यानंतर जे काही घडलं, त्यामुळं रात्रभर झोप लागली नाही, असं चॅट जीपीटीच्या सीईओनी सांगितलंय.

ChatGPT सीईओंची झोप का उडाली?
11 एप्रिल 2025 ला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका 16 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी हा मुलगा चॅटजीपीटीवर आत्महत्येबाबत प्रश्न विचारत होता. चॅटजीपीटीनं त्याला अप्रत्यक्षरित्या प्रश्नांची उत्तरं देत आत्महत्येसंदर्भात मार्गदर्शन केलं, असा आरोप मुलाच्या पालकांनी केलाय. आत्महत्येसाठी मुलाच्या पालकांनी चॅटजीपीटीला जबाबदार ठरवलंय आणि कोर्टात खटलाही दाखल केला. या प्रकरणामुळं सीईओ सॅम ऑल्टमन यांनाही मोठा धक्का बसलाय. या घटनेनंतर मी धड झोपूच शकलेलो नाही, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
चॅट जीपीटीबाबत आणखी काय दावे?
सीईओ सॅम ऑल्टमन यांनी या मुलाखतीत आणखीही काही बाबी स्पष्ट केल्यात. चॅट जीपीटी पूर्णपणे अचूक आहे, असा आमचा दावा नाही. त्यात चुका होऊ शकतात, असं ते म्हणालेत. कंपनीकडून सेफ्टी अपडेट दिलेले आहेत. पण तरीही असे दुर्दैवी प्रसंग घडू शकतात, हे त्यांनी एकाअर्थी मान्य केलंय.
गोपनियतेवर काय भाष्य ?
गोपनीयता आणि ग्राहकांचा विश्वास जपावाच लागेल, हेही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे डॉक्टर-रुग्ण किंवा वकील-ग्राहक यांच्या संभाषणांप्रमाणे एआय संभाषणेही गोपनीय राहणे आवश्यक आहे. एआय चॅटबॉटची उत्तरे ही उपलब्ध चांगल्या आणि वाईट सामूहिक ज्ञानावर आधारित आहे.शेवटी समाजानं एकमेकांशी खुलेपणाने संवाद साधणं आणि जागरुक असणं गरजेचं आहे
तंत्रज्ञान आणि मन्युष्य बुद्धीतला फरक
काहीही झालं तरी एआय तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान आहे. ते कितीही अचूक असलं तरी मानवी मनाचा ठाव घेणं आणि अडचणीच्या काळात पाठीवर हात ठेवण्याची किंवा ती अडचणीची परिस्थिती समजू शकण्याचं मानवी भान या तंत्रज्ञानाला नाही. त्यामुळं कोण कोणत्या मनस्थितीत काय प्रश्न विचारतं आहे, याची जाणीव नसल्यानं भविष्यात याहीपेक्षा अधिक भयानक घटनेची पुनरावृत्ती होणं अशक्य नाही. चॅट जीपीटीच्या सीईओंची झोप उडण्याचं हेच मोठं कारण असण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.











