दुबई- आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या पहिल्या मॅचमुळे मोठा वाद उभा राहिला होता. मात्र टीम इंडियानं मॅचमध्ये पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यानंतर, आता २१ सप्टेंबरला पुन्हा दोन्ही टीम आमनेसामने येणार आहेत.
पाकिस्तानने बुधवारी दुबईच्या टीमचा पराभव केला. त्यामुळे भारतापाठोपाठ पाकिस्ताननंही ग्रुप एमधून सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. सुपर फोरमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर दोन टीम या बी ग्रुपमधून निवडल्या जातील. आता सुपर फोरमध्ये आलेल्या चारही टीमचा एकमेकांशी एकदा मुकाबला होणार आहे. त्यामुळे 21 सप्टेंबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा मॅच होईल.

टीम इंडिया आणि पाकिस्ताननं सुपर फोरमध्ये एन्ट्री केल्यानं ओमान आणि दुबईची टीम आशिया कपमधून बाहेर पडल्यात. तर ग्रुप बीमध्ये सुपर फोरमध्ये येण्यासाठी श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस आहे.
दुसऱ्या मॅचपूर्वीही वाद होणार?
आता पहिल्या मॅचपूर्वी भारत आणि पाकिस्तान मॅचवरुन मोठा वादंग देशात उभा राहिला होता. पहलगाम हल्ल्यानंतर होणाऱ्या या मॅचला देशातून विरोध झाला होता. पाकिस्तानसोबत मॅच खेळण्याचा निर्णय केंद्रानं रद्द करायला हवा होता, अशी भावना देशभरात व्यक्त होत होती. ठाकरे शिवसेनेनं याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती, तर पहलगाम हल्ल्यात ममृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी मॅच पाहू नका असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही मॅच झाली आणि त्यात टीम इंडियानं पाकिस्तानच्या टीमचा दणक्यात पराभवही केला होता.
शेक हँड वाद…
या मॅचमध्ये भारतीय कॅप्टन सूर्यानं टॉरसनंतर पाकिस्तानी कॅप्टनशी शेक हँड केला नाही. तसंच मॅचमध्येही भारतीय क्रिकेटर्सनी पाक क्रिकेटर्सशी संवाद टाळला होता. यानंतर एशिया कपमध्ये नवा वाद निर्माण झाला होता. या टॉसवेळी उपस्थित असलेल्या रेफरींवर कारवाईची मागणी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं केली होती, मात्र ती मागणी आयसीसीनं फेटाळली होती. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या मॅचपूर्वी आणि मॅचमध्ये नवीन वाद होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. टीम इंडिया पुन्हा पाकिस्तानला धूळ चारेल का, याकडंही क्रिकेट जगतात आत्तापासून चर्चा सुरु झाली आहे.











