काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटामध्ये शेतकरी कोलमडून गेला आहे. अशा प्रसंगात राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा केला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी देखील मराठवाड्यातील नुकसान ग्रस्त भागात पाहणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार!
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून बळीराजाची शेती पाण्याखाली गेली आहे. कित्येक शेतातील मातीही पिकांसोबत वाहून गेल्याने जगावं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. आता, हा बळीराजा सरकारकडे अपेक्षा लावून बसलाय, अशा परिस्थितीत राहुल गांधी हे परिस्थितीची पाहणी करणार असल्याने ते केंद्र सरकारकडे नुकसानग्रस्तांसाठी काही मदतीची मागणी करतील अशी अपेक्षा सर्वच शेतकरी बांधवांना आहे. त्यामुळे आगामी काळात राहुल गांधी पर्यायाने काँग्रेस शेतकऱ्यांचा आवाज बनते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठवाड्यातील परिस्थिती चिंताजनक
मराठवाड्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची कर्जफेड करण्याची क्षमता कमी होत असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक जनावरे पाण्यात वाहून गेली किंवा मृत्यूमुखी पडली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. गावांमधील घरे कोसळली, भिंती पडल्या आणि घरगुती वस्तूंचेही नुकसान झाले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. मदतकार्य सुरू असले तरी नुकसानाची तीव्रता मोठी असल्यामुळे दिलासा अपुरा पडत आहे. मराठवाड्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.











