दाक्षिणात्य अभिनेता, राजकीय नेता विजयच्या करुरमधील रोड शोमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 10 मुलांसह 40 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. 51 जणांवर आयसीयूत उपचार सुरु आहेत, मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. आता हा अपघात नेमका कशामुळे झाला याची कारणं शोधण्यात येत आहेत. दुसरीकडे या प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. तामिळनाडूच्या करूरमधील चेंगराचेंगरीमागे वेगवेगळी कारणे सांगितले जात आहे. परंतु आता विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाच्या नेत्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवाय प्रकरणाची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता देखील आहे.
TVK च्या नेत्यांवर गुन्हा; सीबीआय चौकशी?
अभिनेता-राजकारणी विजयच्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाच्या विविध नेत्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टीव्हीके पक्षाचे वरिष्ठ नेते बस्सी आनंद, निर्मल कुमार आणि व्हीपी मथिलागन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी व्ही सेल्वराज यांनी दिली. मर्यादेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने ही घटना घडली. टीव्हीकेने पोलिसांची परवानगी घेतली होती. या रॅलीत दहा हजार लोक सहभागी होणार होते. परंतु प्रत्यक्षात दुप्पट तिप्पट गर्दी झाली. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता देखील या निमित्ताने निर्माण झाली आहे.

कट असल्याचा टीव्हीके पक्षाचा आरोप
गुन्हा नोंदविण्यानंतर टीव्हीके पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रॅली उधळून लावण्यासाठी कट रचला होता. त्यातून दगडफेक झाली, अशी याचिका टीव्हीकेने दाखल केलीय. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशीची मागणी टीव्हीकेने केली आहे. त्यामुळे आता कोर्ट या प्रकरणात नेमका काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
VIDEO | Karur stampede tragedy: Enquiry commission head Justice Aruna Jagadeesan inspects the incident spot.
As many as 38 people lost their lives in a stampede at actor-politician and TVK chief Vijay’s public rally in Karur on September 27.
(Full video available on PTI Videos… pic.twitter.com/ONSTTtLBdo
— Press Trust of India (@PTI_News) September 28, 2025
दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना भरघोस मदत
दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना तामिळनाडू सरकारनं प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केलीय. तर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर अभिनेता विजय यानं या दुर्घटनेनं वेदना झाल्याचं सांगत मृतांना 20 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार मदतीची घोषणा करण्यात आलीय. आता या चेंगारचेंगरीला जबाबदार कोण यावरुन राजकारण सुरु झालेलं आहे. राज्य सरकारच या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप विजय थलपतीनं केलाय. तर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत राज्य सरकार या प्रकरणाचा तपास करणार आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना घडलेल्या या दुर्घटनेनं तामिळनाडूचं राजकारण आता तापताना दिसतं आहे.











