दसरा मेळाव्यावरुन राजकीय शिमगा, ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करुन पूरग्रस्तांना मदत करण्याची भाजपची मागणी, राऊतांचं काय उत्तर?

एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं दसरा मेळावा रद्द करावा अशी मागणी भाजपाकडून जोर धरु लागलीय. तर दुसरीकडे  शिवाजी पार्क मैदानावर ठाकरेंच्या तर आझाद मैदानात शिंदे शिवसेनेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे.

मुंबई- ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होण्यापूर्वीच राजकीय शिमगा सुरु झालाय. मराठवाड्यातील पूरपरिस्थितीमुळं उध्दव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा. तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे

दोन्ही शिवसेनेचे मेळावे दसऱ्याला मुंबईत होत असताना भाजपानं हा सल्ला केवळ ठाकरेंच्या शिवसेनेला दिलाय. अतिष्टीवरुन सरकार करत असलेल्या मदतीवरुन ठाकरेंची शिवसेना सातत्यानं टीका करत असल्यानं हे प्रत्युत्तर देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंची पोस्ट

उध्दव ठाकरे यांनी 5 जिल्ह्यात तब्बल 3 तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव,आता वेळ आहे कृती करायची आहे. मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना दिला पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचांराचे सोने लुटले जायचे. आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार, नुसताच थयथयाट अन् कांगावा होणार, त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा?

भाजपाच्या सल्ल्याची गरज नाही- संजय राऊत

भाजपानं दिलेल्या सल्ल्यांना ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. भाजपाच्या उधारीच्या सल्ल्याची गरज नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपाला सुनावलं आहे. होणारा दसरा मेळावा राजकारणाची नवी दिशा ठरवणारा असेल असंही राऊत म्हणालेत.

आत्तापर्यंत कधी दसरा मेळावा झाला रद्द?

ऑक्टोबर 1966 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला. तेव्हापासून आजतागायत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे. आतापर्यंत 2006 आणि 2009 मध्ये दोनवेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आलाय. मात्र आता अतिवृष्टीमुळे बळीराजा उद्धवस्त झाल्यानं दसरा मेळावा रद्द करण्याची मागणी करत भाजपानं उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलंय

आझाद मैदानात शिंदे शिवसेनेच्या मेळाव्याची जय्यत तयारी

एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं दसरा मेळावा रद्द करावा अशी मागणी भाजपाकडून जोर धरु लागलीय. तर दुसरीकडे  शिवाजी पार्क मैदानावर ठाकरेंच्या तर आझाद मैदानात शिंदे शिवसेनेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. याशिवाय ठाकरेंच्या सेनेकडून दसरा मेळाव्याबाबत आणखी एक टीझर रिलिज करण्यात आलाय दरम्यान, दसरा मेळाव्याबाबत सद्सद्विवेक बुद्धीला पटेल तो निर्णय घ्यावा असं वक्तव्य करत अजित पवारांनी केलंय.

आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे काही भाष्य करणार का? याकडे राज्याचं लक्ष असेल. याशिवाय पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरुन उद्धव ठाकरे केंद्र आणि राज्य सरकावर घणाघात करणार हे उघड आहे. मात्र याच पूरपरिस्थितीचा हवाला देत भाजपानं दसरा मेळावा रद्द करण्याचा सल्ला देत उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठलंय


About Author

Smita Gangurde

Other Latest News