जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने एक मोठी घडामोड घडत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. 13 ऑक्टोबरला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यपदासाठी आरक्षण सोडत निघणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने तशी घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांची धाकधुक यामुळे वाढली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अद्याप निवडणुकीची घोषणा झालेली नाही. दिवाळीनंतर घोषणा होण्याची शक्यता आहे. याआधी प्रशासकीय पातळीवरील कामकाज पूर्ण केले जात आहे. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करत आता या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती देण्यात आली आहे.

13 ऑक्टोबरला सदस्यपदाची आरक्षण सोडत
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्याचबरोबर नगरपरिषद, नगरपंचायतींची प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहेत.
34 झेडपींचे अध्यक्षपदाचे आरक्षण
- ठाणे -सर्वसाधारण (महिला)
- पालघर – अनुसुसूचित जमाती
- रायगड- सर्वसाधारण
- रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
- नाशिक -सर्वसाधारण
- धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- नंदूरबार-अनुसूचित जमाती
- जळगांव – सर्वसाधारण
- अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
- पुणे -सर्वसाधारण
- सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सांगली – सर्वसाधारण (महिला)
- सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
- छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
- जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- बीड – अनुसूचित जाती (महिला)
- हिंगोली -अनुसूचित जाती
- नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- लातूर – सर्वसाधारण (महिला)
- अमरावती – सर्वसाधारण (महिला)
- अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
- परभणी – अनुसूचित जाती
- वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
- बुलढाणा -सर्वसाधारण
- यवतमाळ सर्वसाधारण
- नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- वर्धा- अनुसूचित जाती
- भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
- चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
- गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून जिल्हा परिषद निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच निवडणुका पार पडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
प्रारूप मतदार यादी संदर्भात…
राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.











