फास्टॅग प्रणालीमुळे महामार्गांवर वेळेची मोठी बचत होते. या तंत्रज्ञानामुळे वाहनांना टोल नाक्यावर थांबावे लागत नाही, कारण टोल आपोआप कपात होतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहते, इंधनाची बचत होते आणि प्रदूषणही कमी होते. फास्टॅग वापरल्याने प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि आधुनिक बनतो. मात्र बऱ्याचदा फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलन्स नसतो अथवा कधी ही प्रणाली काम करत नाही. अशावेळी वाहनधारक अथवा चालकांना रोखीने दुप्पट रक्कम भरावी लागते. मात्र केंद्र सरकारने आता वाहन चालकांसाठी युपीआय पेमेंटचा पर्याय खुला केला आहे.
फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा
केंद्र सरकारने फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या घोषणेनुसार आता, जर एखाद्या वाहनात फास्टॅग नसेल किंवा ते काम करत नसेल, तर टोल प्लाझावर रोखीने दुप्पट टोल कर भरण्याऐवजी वाहनचालक UPI वापरून पैसे भरू शकणार आहेत. फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना यासाठी दुप्पट टोलऐवजी फक्त 1.25 टक्के टोल भरावा लागणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली 15 नोव्हेंबरपासून देशभरातील टोल प्लाझावर लागू केली जाणार आहे.

जुन्या नियमांनुसार, जर एखाद्या वाहन चालकाकडे फास्टॅग नसेल किंवा तो वैध नसेल, तर त्याला सामान्य टोल शुल्काच्या दुप्पट रोखीने टोल द्यावा लागत होतो. जो एक मोठा दंड मानला जात असे. मात्र, आता फास्टॅग नसलेली किंवा निष्क्रिय फास्टॅग असलेली वाहने युपीआयद्वारे 1.25 पट टोल शुल्क भरावे लागणार आहे. याचा अर्थ असा की, UPI द्वारे पैसे भरताना वाहन चालकांकडून दुप्पट टोल आकारला जाणार नाहीये. उदाहरणार्थ, जर टोल शुल्क 100 रूपये असेल, तर पूर्वी फास्टॅग नसल्याबद्दल दंड म्हणून 200 रूपये भरावे लागत होते. मात्र, आता जर तुम्ही UPI वापरून पैसे दिले तर, तुम्हाला फक्त 125 रूपये द्यावे लागतील.
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
टोल वसुली वाढवण्यासाठी आणि ती अधिक ग्राहक-अनुकूल बनवण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे डिजिटल पेमेंटला चालना मिळेल, तर टोल प्लाझावरील फसव्या व्यवहारांनाही आळा बसेल, ज्यामुळे टोल वसुली वाढण्याची शक्यता आहे. भारतामध्ये गेल्या काही वर्षांत शासकीय पातळीवर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पुढे यामध्ये नेमके आणखी काय उपाययोजना अथवा बदल केले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.











