Eknath Shinde – यूपीए सरकारच्या कालावधीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती, मात्र 2014 पासून तब्बल दहा लाख कोटी रुपयांची मदत केंद्राने राज्याला केली आहे. तर सहकार चळवळीला बदनाम करायचे, निस्तेज करायचे आणि नंतर सर्व काही हडप करायची वृत्ती फोफावली होती. सहकारातील बेशिस्त आणि एकाधिकारशाहीला देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी लगाम घालून भाकरी फिरवण्याचे महत्वाचे काम केले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तसेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते रोजी लोणी अहिल्यानगार येथे पार पडले. त्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

सहकारात नवनवीन बदल होताहेत
दरम्यान, सतत नव्याच्या शोधात असताना जुन्या परंपरा आणि नवीन तंत्रज्ञान नवसंशोधन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला आहे. म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले असून त्याचे शिल्पकार अमित शाह आहेत, असेही शिंदे म्हणाले. कोणत्याही क्षेत्रात बदल झाले नाही तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही. शहा यांच्या नेतृत्वात आजच्या सहकारात नवनवीन बदल होत आहेत, सहकार क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल होत आहे. गृहमंत्री असून देखील त्यांना शेती शेतकरी यांच्या बद्दल प्रचंड आस्था आहे.
शाह यांनी सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणली
राज्यावर यंदा पूर परिस्थितीचे फार मोठे संकट कोसळले आहे. येथे शेतकऱ्यांची जमीन शेती आणि संसार उध्वस्त झाले आहेत. सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आपल्याकडून राज्याला भरीव आर्थिक मदतीची गरज आहे. राज्यावर जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा केंद्र सरकार पाठीशी राहिले आहे. आम्हाला ठाम विश्वास आहे की केंद्र सरकार आम्हाला दिलासा देईल. ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने अडचणीत आले तेव्हा शहा यांनी दहा हजार कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स माफ केला होता, याची आठवण शिंदे यांनी करून दिली.
शाह यांनी सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणली, इथेनॉल उत्पादनाला चालना दिली. या सर्वाचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला पाहिजे असेही त्यांचे धोरण आहे. ग्रामीण सहकारी बँकांना नवसंजीवनी देण्याचे काम ही शाह यांनी केले.











