दैनंदिन जीवन जगत असताना मानवतेच्या भावनेने एकमेकांना अडचणीत मदत करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे बनले आहे. अशा परिस्थितीत मुंबईतून एक वेगळीच घटना समोर आली आहे. राम मंदिर रेल्वे स्थानकावर काल मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने सगळ्यांनाच थक्क केलं आहे. एका गर्भवती महिलेला लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि काही क्षणांतच परिस्थिती गंभीर झाली. मात्र, उपस्थित असलेल्या एका धाडसी तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आई आणि बाळ दोघांचाही जीव वाचला.
राम मंदीर स्थानकावर काय घडलं?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा तोच तरुण म्हणजे विकास दिलीप बेद्रे, एक व्यावसायिक सिनेमॅटोग्राफर. होय, हा तरुण डॉक्टर नाही, वैद्यकीय अनुभव नाही पण तरीही त्याने केवळ धैर्य, शांतता आणि समजूतदारपणाच्या जोरावर एका आईला सुरक्षित प्रसूती करून दिली आणि एका नवजात बाळाचा जीव वाचवला.घटना काल रात्री 12.40 च्या सुमारास घडली. गर्भवती महिला गोरेगाव स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. मदतीसाठी ती ओरडू लागली. याच वेळी फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करणारा विकास बेद्रे, जो अहमदाबादला कामानिमित्त जात होता, त्याने हा आवाज ऐकला.
शेजारच्या डब्यात महिला गंभीर अवस्थेत असल्याचे लक्षात येताच त्याने ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचून गाडी राम मंदिर स्टेशनवर थांबवली.तिथे ना डॉक्टर होते, ना वैद्यकीय सुविधा. पण परिस्थिती अत्यंत गंभीर बाळाचं डोकं अर्धवट बाहेर आलेलं. अशा वेळी विकासने प्रसंगावधान राखत आपल्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मैत्रिणीला डॉ. देविका देशमुख यांना फोन लावला. व्हिडिओ कॉलवरून डॉक्टरांनी प्रसूतीची प्रक्रिया सांगितली, आणि विकासने शांतपणे त्या प्रत्येक सूचनांचे पालन केलं. त्याने आजूबाजूच्या प्रवाशांची मदत घेतली, चहावाल्याकडून स्वच्छ कपडे आणले, चादरी गोळा केल्या आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार प्रसूती राम मंदिर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच यशस्वीरीत्या पूर्ण केली. काही मिनिटांतच बाळाच्या रडण्याचा आवाज स्टेशनवर गुंजला. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असून नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तो तरूण नेमका आहे कोण?
विकास हा व्यावसायिक सिनेमॅटोग्राफर असून त्याने अनेक शॉर्ट फिल्म्स आणि सिनेमॅटिक प्रोजेक्ट्ससाठी काम केलं आहे. हार्दिक पांड्यासोबतच्या एका मॅचदरम्यान त्याने केलेल्या सिनेमॅटोग्राफीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र या वेळी त्याने कॅमेऱ्यामागून नव्हे, तर जगण्याच्या खऱ्या फ्रेममध्ये एक सुंदर क्षण टिपला . एका नवजात बाळाचं जीवन वाचवलं. विकासचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे, शिवाय घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे.
👉 Follow @thelogicalindian The video by @manjeet9862_ shows a man’s couragɇous ⱥctions on a Mumbai railway platform have captured hearts nationwide after he helped deliver a baby at Ram Mandir station, proving that everyday heroes walk among us.
👉Midnight Rescue on Mumbai… pic.twitter.com/UQB4o11GWR
— The Logical Indian (@LogicalIndians) October 16, 2025












