मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी त्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावतात किंवा रद्द होतात. प्रवाशांना लांब रांगा, गर्दी, उशीर आणि असुविधा यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पर्यायी प्रवास व्यवस्था नसल्याने कामावर जाणारे आणि प्रवास करणारे लोक अडचणीत सापडतात. उद्या रविवारी, 19 ऑक्टोबर रोजी देखील मुंबईत मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी 19 ऑक्टोबर देखभाल दुरूस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार–ठाणे आणि कांजूरमार्ग स्थानक परिसरात पॉवर ब्लॉकमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून, प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकचा निर्णय रद्द केला आहे.

मध्य रेल्वेवर विद्याविहार–ठाणे दरम्यान पाचवा व सहावा मार्ग, तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी व वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील ब्लॉक सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत असेल. दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे मेल-एक्सप्रेस गाड्या सुमारे 10–15 मिनिटे उशिराने पोहोचू शकतात. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान सकाळी 10.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. या काळात सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे व गोरेगाव दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात येईल.
प्रवाशांच्या सोयासाठी विशेष लोकल
या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला–पनवेल दरम्यान स्पेशल लोकल सेवा चालविली जाईल. कांजूरमार्ग स्थानकावर मध्यरात्री ‘पॉवर ब्लॉक’कांजूरमार्ग स्थानकावर मध्यरात्री ‘पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाचे ट्रस गर्डर्स काढणे व उतरविण्यासाठी शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत अप, डाउन, धीम्या, जलद तसेच 5 आणि 6 व्या मार्गांवर ब्लॉक राहील. या काळात धीम्या गाड्या जलद मार्गावर वळविल्या जातील आणि नाहुर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.
दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे रविवार (19 ऑक्टोबर) मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना गैरसोय होऊ शकते. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, वेळापत्रक पाहूनच प्रवासासाठी घराबाहेर पडावे.
वेळापत्रक पाहून प्रवास करा!
या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.











