आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दागिने तसेच नाणी खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. हा शुभ मुहूर्त साधण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. मात्र एकीकडे सोने आणि चांदीचे दर देखील गगनाला भिडलेले आहेत. पुण्यातील सराफा बाजारपेठा चांगल्याच सजल्या आहेत. भावांमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी सुद्धा ग्राहकांचा कल सोने-चांदी खरेदीकडे असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी सराफा दुकानात गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यातील सराफा बाजारांत गर्दी
सोन हे धनाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं आज दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशीला सोन्याची पूजा केली जाते. त्यामुळं सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक विविध पाहायला मिळतात. सोन्याचे भाव 1 लाख 31 हजार 840 आहेत तर चांदीच्या भावात सुद्धा वाढ झाली असून चांदी 1 लाख 76 हजार 130 रुपये इतक्या दरावर आहे असं असलं तरी सुद्धा ग्राहकांकडून आजच्या दिवशी एक ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करण्याची लगबग पाहायला मिळते आहे.

अमेरिका चीनमधील व्यापार तणाव, जागतिक अनिश्चिततेमुळे भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे .सोन्यासह चांदीचे ही भाव ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे, सणासुदीच्या काळात तसेच लग्नसराईत सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनत्रयोदशीला सोने खरेदीचे महत्व
धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे हे भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि आरोग्याचे देव धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असा समज आहे की या दिवशी सोने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्यास वर्षभर घरात समृद्धी आणि सुखशांती नांदते. म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी लोक मोठ्या उत्साहाने सोन्याचे दागिने, नाणी, किंवा सोन्याच्या विटा खरेदी करतात.
या दिवशी खरेदी केलेले सोने केवळ अलंकारासाठी नसून, ते समृद्धीचे आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. अनेक व्यापारी आणि कुटुंबे नवीन आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक याच दिवशी सुरू करतात. बाजारात या दिवशी विशेष सवलती, ऑफर्स आणि नवीन डिझाईन्स उपलब्ध असतात, त्यामुळे लोकांची मोठी गर्दी सोनारांच्या दुकानात दिसते.
धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचा प्रारंभ मानला जातो आणि या दिवशी केलेली सुवर्णखरेदी संपूर्ण वर्षभर शुभ फल देते असा विश्वास आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसारख्या शहरांपासून ग्रामीण भागातही सोन्याच्या खरेदीला प्रचंड उत्साह असतो. सोने हे केवळ आर्थिक संपत्तीचे नाही तर सांस्कृतिक परंपरेचेही द्योतक आहे.











