शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मोठी अपडेट; 4 थी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, सुधारीत जीआर समोर

गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून 4 थी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे, तसा जीआर समोर आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती परीक्षा यांना अत्यंत महत्व आहे. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि शैक्षणिक प्रगती साधण्याची प्रेरणा निर्माण होते. शिष्यवृत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण पुढे नेण्यासाठी मदत मिळते. तसेच, या परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, समज आणि तर्कशक्ती विकसित करण्यास हातभार लावतात. 4 थी आणि 7 वीच्या याच परीक्षांच्या संदर्भात आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शासनाचा निर्णय

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. यामुळे 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) साधारणतः फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल. तर इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 2026 च्या कोणत्याही रविवारी करण्यात येईल. 2026-27 पासून पुढे इयत्ता चौथी इयत्ता सातवी मध्ये नियमितपणे शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना होणारा फायदा

इयत्ता चौथीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवीसाठी प्रतिवर्षी सात हजार पाचशे रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीकरिता प्रत्येकी 16,693 आणि इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवी करिता प्रत्येकी 16,588 शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील. त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नाव ‘प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (इ.चौथी स्तर) आणि ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (इ.सातवी स्तर) असे करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे फायदा होतो. सर्वप्रथम, ती आर्थिक मदत पुरवते ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधने मिळतात. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेची जाणीव होते. यामुळे ते अधिक मेहनत घेऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित होतात. अनेक वेळा शिष्यवृत्तीमुळे पालकांवरील आर्थिक ओझेही कमी होते. तसेच, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, आत्मनिर्भरता आणि शैक्षणिक प्रगतीची भावना निर्माण करते. त्यामुळे शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक सहाय्य नसून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत पायाभूत मदत ठरते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News