औद्योगिक सांडपाणी आणि शहरांतील सांडपाण्याचा अनियंत्रित प्रवाह नद्यांच्या प्रदूषणाचे मुख्य कारण ठरत आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी आणि घरगुती सांडपाणी शुद्धीकरणाशिवाय नद्यांमध्ये सोडले जाते, ज्यामुळे जलजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो. अशीच काहीशी परिस्थिती पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातुन वाहणाऱ्या पवना नदीची झाली आहे. पवन नदीच्या पाण्याच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली असून हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.
पवना नदीचे पाणी प्रदूषित
पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी गुरव, नवी सांगवी आणि जुनी सांगवी या भागांतून सांडपाणी नदीत मिसळत असून त्यामुळे पाण्याची गुणवत्ता देखील मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पवना नदीचे सुमारे 24.40 किलोमीटर अंतर पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती असून सांडपाणी वाहिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी वाहिन्यांमधून गळती होत आहे. काही ठिकाणी झाकणांवरून सांडपाणी ओसंडून थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढून पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे.

नद्यांच्या प्रदूषणाचे परिणाम
पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाण्याची गुणवत्ता घटते. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. पिण्याचे पाणी दूषित होणे, त्वचारोग आणि जलजन्य आजारांची वाढ ही चिंताजनक बाब आहे. शासन आणि स्थानिक प्रशासनाने सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे उभारून आणि कडक नियम अंमलात आणून या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
तात्काळ उपाययोजना आवश्यक
स्थानिक प्रशासन आणि औद्योगिक वसाहतींकडून या नद्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. नदीचं पाणी इतकं दूषित झालं आहे की त्यामध्ये मासेसुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या औद्योगिक वसाहती, अतिक्रमण आणि सांडपाण्याचा अनियंत्रित विसर्ग यामुळे नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तसेच त्यांनी स्थानिक प्रशासनाला विनंती केली आहे की, नदीच्या सुशोभीकरणाकडे लक्ष देण्यापेक्षा नदी स्वच्छ राहील याकडे अधिक लक्ष द्यावं. नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आणि तिचं आरोग्य टिकवण्यासाठी तातडीने उपयोजना करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.











