मागच्या काही महिन्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू राजकीय व्यासपीठावर एकत्र आलेत. एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आणि एकमेकांना सातत्याने पाण्यात बघणारे ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र आल्याने मराठी माणसाला मोठा दिलासा मिळाला. परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय स्वार्थासाठीच आणि स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठीच एकत्र आले असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. अशातच आता आम्ही दोघे भाऊ भाऊ एकत्र कशासाठी आणि कोणासाठी आलोय हे खुद्द उद्धव ठाकरेंनीच जाहीर सभेत सांगून टाकले आहे.
एकत्र आलो ते मराठी माणसासाठी (Uddhav Thackeray)
आज मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात महाविकास आघाडीने एल्गार मोर्चा पुकारला होता. यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला या सरकार विरोधात लढावं लागेल. फक्त आम्ही भाऊ भाऊ एकत्र आलो म्हणजे सगळे झालं असं म्हणून चालणार नाही. आम्ही भाऊ भाऊ एकत्र आलो कारण तुमच्यासाठी आलो. आम्ही एकत्र आलो ते मराठी माणसासाठी, आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी… अशावेळी आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणे आम्हाला साथ देणं गरजेचं आहे. या लढ्याची मूठ आपल्याला आवळली पाहिजे असा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं.

अमित शहा म्हणजे ऍनाकोंडा
ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. तर लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो आज ठिणगी बघत आहात. या ठिणगीची आग कधी तुमच्या बुडाला लागेल ते तुम्हाला कळणार पण नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला. तसेच त्यांनी आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही समाचार घेतला. शोलेत एक डायलॉग आहे. दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाही तर अॅनाकोंडा येईल. मी यांना कोंडा म्हणतो याचं कारण म्हणजे यांनी सर्वात आधी आपला पक्ष चोरला , आपले चिन्ह चोरलं, यानंतर माझे वडीलही सोडण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. आता त्यांचं मन अजूनही समाधानी झालेलं नाही. आता ते मत चोरू लागले आहेत असे म्हणतं उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यासह भाजपवर घणाघात केला.











