PCMC Election: पिंपरी-चिंचवड महापालिकेची मतदार यादी 06 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर काही दिवासांनी अंतिम मतदार यादी समोर येईल.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, आणि ग्रामपंचायतींसाठी प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. मतदार याद्यांचे पुनरावलोकन, मतदार केंद्रांची आखणी, आणि आरक्षण जाहीर करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

पीसीएमसी निवडणुकीच्या हालचाली सुरू

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. नागरिकांना14 नोव्हेंबरपर्यंत हरकती किंवा सूचना सादर करता येतील. चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचे प्रभागनिहाय विभाजन करून तयार केलेली प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. 6 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना या प्रारूप यादीवर त्यांच्या हरकती आणि सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.

14 नोव्हेंबरनंतर अंतिम यादी प्रसिद्ध होणार

प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची तपासणी, सुनावणी आणि निर्णय घेण्यासाठी, संयुक्त शहर अभियंता अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण आणि सुनील भगवानी यांची अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे क्षेत्रीय कार्यालयांनी सांगितले. या संदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला. नागरिक 6 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील मतदार यादी कक्षात तसेच सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या हरकती आणि सूचना सादर करू शकतात.


About Author

Rohit Shinde

Other Latest News