बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्याची मागणी शेहझीन सिद्दीकी यांनी केली आहे. याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. हत्येचे खरे गुन्हेगार पकडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.
पत्नी शहझीन सिद्दीकी यांच्या याचिकेत काय ?
शहझीन यांनी दाखल केलेल्या याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई पोलिसांनी खऱ्या आरोपींना अटक करण्यात अपयश ठरले आणि तपासामध्ये अनेक राजकीय व प्रभावशाली व्यक्तींचा हस्तक्षेप झाला असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आपण दिलेल्या जबाबांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आणि तपास जाणीवपूर्वक दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने केला गेला, असा आरोप शहझीन यांनी केला आहे. पोलिसांच्या तपासाचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे की, हा तपास ‘उंदीर पकडण्यासाठी पर्वत खोदल्यासारखा’ झाला आहे, असंही शहझीन यांनी म्हटं आहे.

याचिकेत आणखी एक मुद्दा नमूद करण्यात आला आहे. तो म्हणजे, तपासकार्य अचानक मधेच थांबवण्यात आलं. काही प्रभावशाली लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप शहझीन यांनी केला आहे. पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात भविष्यात आणखी काही खळबळजनक खुलासे समोर येतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
12 ऑक्टोबर 2024, बाबा सिद्दीकींची हत्या
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता पत्नीने कोर्टात धाव घेतल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.











