महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र यावरुन सोशल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज व्यथित झाले आहेत. परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज खरंच किर्तन सोडणार का? अशा आशयाचा चर्चा देखील सध्या खरंतर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढे नेमकं काय घडणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लेकीच्या साखरपुड्याचा थाट आणि टीका
इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या किर्तनामुळे नाही तर त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे तूफान चर्चेत आहेत. इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने झाला. जवळपास 2000 लोकांची उपस्थिती आणि शाहीथाट बघायला मिळाला. महाराजांची लेक ज्ञानेश्वरी भला मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मंगल कार्यालयात डोळ्यावर गॉगल लावून पोहोचली.

एक न्यारा थाट महाराजांच्या लेकीचा दिसला. मात्र, या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज टिकेचे धनी ठरले. वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर टीका झाली. किर्तनात साधी लग्न करण्याचा उपदेश देणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले.
नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
“आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला… तुम्ही मला घोडे लावा.. माझा पिंड गेलाय… माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे.”
“ता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता. तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही” असे इंदुरीकर महाराज म्हणाले. त्यामुळे इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार की काय? अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. एकूणच आगामी दोन ते तीन दिवसांत इंदुरीकर महाराज त्यासंबंधीचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.











