Nivedita Saraf | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या दमदार कामगिरीनंतर देशभरात पक्षाच्या विजयाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. एनडीएने सत्ता राखली आणि भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर राहत सर्वात मोठा पक्ष ठरला. या राजकीय घडामोडींचा प्रभाव मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांवरही दिसून येत आहे. अशात मराठी चित्रसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेलं वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे.
मी सुद्धा कट्टर भाजपची (Nivedita Saraf)
निवडणुकीचा निकाल स्पष्ट होत असताना आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी मुक्तपणे आपली राजकीय भूमिका सांगितली. त्या म्हणाल्या, “बिहारमधील या निकालामुळे मला खूप आनंद झाला आहे… कारण मी कट्टर बीजेपी आहे.” त्यांच्या या थेट आणि बेधडक विधानाने कार्यक्रमातील सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. मराठी मनोरंजन क्षेत्रातील वरिष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्रीने अशा स्वरूपाचा राजकीय पक्षाशी असलेला संबंध उघडपणे मांडल्याने सोशल मीडियावर याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

महेश कोठारे यांच्या वक्तव्यानंतर नवी चर्चा
याआधी दिवाळी पहाट कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे मनापासून कौतुक केले होते. “मी मोदीजींचा भक्त आहे… मी भाजपचा भक्त आहे. मुंबई महापालिकेत कमळच फुलेल आणि भाजपचा महापौर निश्चित होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. कोठारे यांच्या वक्तव्यामुळे आधीच निर्माण झालेल्या चर्चेचा उहापोह सुरू असतानाच निवेदिता सराफ यांनी खुलेपणे “मी कट्टर बीजेपी आहे” असे सांगितल्याने मनोरंजन क्षेत्रात राजकीय भूमिका स्पष्ट करण्याच्या प्रक्रियेला नवा रंग चढला आहे.
बिहारच्या विजयानंतर कलाकारांमध्ये उत्सुकता
बिहारमध्ये भाजपने 95 जागांवर आघाडी घेतली आणि जेडीयू 82 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या निकालानंतर सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चा वाढलीच, मात्र त्याचा परिणाम मनोरंजन जगतावरही झाला आहे. काही कलाकारांनी अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिल्या, काहींनी मौन बाळगले; पण निवेदिता सराफ यांनी आपला राजकीय कल कोणताही आडपडदा न ठेवता मोकळेपणाने मांडला.
कलाविश्वातील मान्यवर कलाकार उघडपणे राजकीय भूमिका मांडू लागल्याने पुढील काही दिवसांत नवे प्रतिसाद आणि नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे. निवेदिता सराफ यांच्या या वक्तव्यामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रातील राजकीय वातावरण अजून रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.











