बीएमसीची मुंबईतील 426 महागड्या घरांसाठी लॉटरी; लोकांचा नगण्य प्रतिसाद

बीएमसीने मुंबईतील घरांसाठी नुकतीच लॉटरी जाहीर केली. एकूण 426 घरांसाठी ही लॉटरी जाहीर करण्यात आली होती. पण या लॉटरीला मुंबईकरांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसत आहे.

मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर मिळवण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यांत असते, परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरांच्या किंमतींमुळे हे स्वप्न अधिकच दूर जाताना दिसते. बांधकाम खर्च, प्रीमियम, कर आणि जमीनदर वाढल्याने घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता कमी होत आहे. अशा परिस्थितीत बीएमसीने मुंबईतील घरांसाठी नुकतीच लॉटरी जाहीर केली. एकूण 426 घरांसाठी ही लॉटरी जाहीर करण्यात आली होती. पण या लॉटरीला मुंबईकरांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसत आहे.

426 महागड्या घरांची लॉटरी फसली !

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत 426 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन लॉटरी जाहीर करण्यात आली. मात्र, या घरांकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली असल्याचं पहायला मिळत आहे. कारण, लॉटरीसाठी नोंदणी जरी जास्त नागरिकांनी केली असली तरी प्रत्यक्षात अनामत रक्कम मात्र, खूपच कमी जणांनी भरल्याचं समोर आलं आहे. बीएमसीच्या पहिल्या लॉटरीत समाविष्ट असलेल्या घरांच्या किमती इतक्या जास्त आहेत की, त्या सामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर दिसत आहेत. कदाचित म्हणूनच 426 बीएमसी घरांसाठी फक्त 1943 नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे.

बीएमसीच्या लॉटरीकडे नागरिकांची पाठ

लॉटरीसाठी लॉग ईन करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर होती. गृहनिर्माण तज्ञांचा असा विश्वास आहे की, बीएमसी लॉटरीला कमी प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई मंडळाच्या लॉटरीचे उदाहरण देत तज्ञांनी सांगितले की बीएमसी लॉटरीला प्रतिसाद नगण्य होता.
इतक्या कमी वेळात ही पहिलीच लॉटरी असूनही, प्रत्येक घरासाठी अंदाजे पाच लोकांनी अर्ज केले आहेत, जो चांगला प्रतिसाद आहे. बीएमसीने मुंबईतील प्रकल्पग्रस्त लोक (पीएपी) अंतर्गत वाटप केलेल्या 426 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबरपासून सुरू झाली. बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत 26466 लोकांनी नोंदणी केली होती. 2658 लोकांनी 1180 रुपये शुल्क भरून फॉर्म सादर केला, तर 1943 लोकांनी फ्लॅटसाठी 11,000 रुपये अनामत रक्कम जमा करून प्रक्रिया पूर्ण केली.
मुंबईतील एका वरिष्ठ गृहनिर्माण तज्ञाने सांगितले की, जर मुंबईतील लॉटरीला 50,000 पेक्षा जास्त अर्ज आले नाहीत तर लॉटरीला प्रचंड प्रतिसाद नसल्याचं मानलं जातं. त्यांनी पुढे सांगितले की, 2016 मध्ये म्हाडाने 972 घरांसाठी लॉटरी काढली होती, ज्यामध्ये एकूण 1,69,000 नागरिकांनी अनामत रक्क्म भरून अर्ज केले होते. शिवाय, 2023 मध्ये, म्हाडाने 4082 घरांसाठी लॉटरी काढली होती, ज्यासाठी 1,00,000 हून अधिक अर्ज आले होते.
 2024 मध्ये, म्हाडाने मुंबई मंडळासाठी 2030 घरांसाठी लॉटरी काढली होती, ज्यासाठी 1,29,000 लोकांनी अर्ज केले होते. सरासरी, प्रत्येक घरासाठी 20 ते 25 नागरिकांनी आपले नशीब आजमावत होते.

About Author

Rohit Shinde

Other Latest News