पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा निश्चितच चिंतेचा विषय बनला आहे. शहराच्या जलद वाढीबरोबरच चोरी, हत्या, टोळीयुद्ध आणि अमली पदार्थांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या वारंवार होणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता, वाढलेला ताण आणि योग्य गस्त व्यवस्था नसल्याचे मुद्दे अधोरेखित होत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना त्वरीत पकडण्यात उशीर होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे या प्रकरणाला पुन्हा हवा मिळाली आहे.
सिंहगड कॉलेज परिसरात तरूणाची हत्या
पुणे शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. सिंहगड रोड परिसरातील सिंहगड कॉलेजच्या जवळ एका 20 ते 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये ही आणखी एक भर असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी रस्त्याच्या कडेला तरुणाचा गंभीर अवस्थेत मृतदेह पाहिल्यानंतर तत्काळ सिंहगड रोड पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, तरुणाच्या डोक्यावर मोठा मार झाल्याचे आढळले. प्राथमिक पंचनामा आणि पाहणीवरून दगडाने ठेचून तसेच कोयत्याने वार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
तरूणाच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि गुन्ह्यातील शस्त्रांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. या निर्घृण खुनामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील गुन्हेगारी आता राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. ड्रग्जची तस्करी, कोयता गँगची दहशत ते दिवसाढवळ्या हत्यांच्या सत्रामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. त्यामुळे दुसरीकडे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.












