Suraj Chavan Marriage Card : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये शांत, साधा-भोळा आणि प्रामाणिक वाटणारा सूरज चव्हाण विजेतेपद पटकावून झळकला. त्यानंतर ‘झापुक झुपूक’ चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात केली. चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी सूरजचा लोकप्रियतेचा आलेख मात्र सातत्याने वाढत गेला. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या नव्याने बांधलेल्या स्वप्नातील घराचा गृहप्रवेश सोहळा साजरा केला आणि त्याचा सुंदर व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत आनंद व्यक्त केला. अशा आनंदाच्या क्षणांनी भरलेल्या त्याच्या आयुष्यात आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा येऊन ठेपला आहे. सूरज लग्नबंधनात अडकणार आहे.
सूरजचे लग्न कोणासोबत?
गेल्या काही दिवसांत सूरजने आपल्या सोशल मीडियावर काही संकेत देत लग्नाची चाहूल लावली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरात त्याच्यासोबत राहिलेली आणि ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभ वालावलकर हिने सूरजच्या आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या केळवणाचा व्हिडीओ शेअर केला. त्यातून सूरजच्या होणाऱ्या साखरपुड्याची आणि वधूची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचली. हे स्पष्ट झालं की सूरज आपल्या कुटुंबातीलच, म्हणजे चुलत मामाच्या मुलीशी विवाह करणार आहे. संजना हे त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव असून या दोघांची ओळख लहानपणापासून आहे. त्यामुळे हे नातं केवळ कुटुंबाने ठरवलेलं नसून दोघांच्या मनाने जुळलेलं प्रेमविवाह आहे.

लग्नपत्रिका व्हायरल (Suraj Chavan Marriage Card)
सूरज आणि संजनाच्या लग्नाची सर्व तयारी जोरात सुरू आहे. 29 नोव्हेंबर रोजी दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असून या दिवसाची चाहत्यांपासून कुटुंबापर्यंत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्याआधी 28 नोव्हेंबरपासून मेहंदी, हळद यासारख्या पारंपरिक लग्नविधींची सुरुवात होणार आहे. नुकतीच त्यांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर समोर आली असून ती पाहून चाहत्यांनी आणखी उत्साह व्यक्त केला आहे. पत्रिकेनुसार कै. दत्तात्रय नारायण चव्हाण यांचा मुलगा सूरज आणि श्री. ज्ञानेश्वर विलास गोफणे यांची कन्या संजना यांचा विवाह 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माऊली गार्डन हॉल, गोटेमाळ, खळद येथे हा सोहळा पार पडेल.
बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेला सूरज आता आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा साजरा करतो आहे. त्याची प्रामाणिक स्वभाव, साधेपणा आणि कुटुंबाशी असलेली नाळ यामुळे त्याचे चाहते त्याच्याशी अधिक जवळीक अनुभवतात. त्यामुळेच सूरज-संजना जोडीच्या फोटो, व्हिडीओ आणि लग्नातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. सूरजच्या जीवनातील नव्या पर्वासाठी आणि या नव्या सुंदर प्रवासासाठी सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.











