मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत आहे. या महिन्याचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी आहे, कारण या महिन्याला “श्रीकृष्णमास” असेही म्हणतात आणि तो भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते. या महिन्यात विशेष पूजा आणि उपवास केल्याने पुण्य मिळते आणि भक्तांवर श्रीकृष्णाची कृपा होते, अशी श्रद्धा आहे.
मार्गशीर्ष महिन्याचा श्रीकृष्णाशी संबंध
धार्मिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात केलेली भक्ती आणि पूजा फळाला येते. या महिन्यात श्रीकृष्णाच्या भक्तीला विशेष महत्त्व दिले जाते. तसेच, या महिन्यात महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करणे देखील शुभ मानले जाते, कारण असे केल्याने सुख आणि समृद्धी मिळते.

मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाची पूजा कशी करावी
मार्गशीर्ष महिन्यात भक्त भगवान श्रीकृष्णाची विशेष पूजा करतात. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर काहीजण ब्रम्हमुहूर्तावर देखील पूजा करतात. या वेळी श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करणे, लोणी आणि साखरेचा प्रसाद आणि दिवा लावणे पुण्यकारक मानले जाते. यासोबतच गायत्री मंत्र आणि विष्णु सहस्रनामाचा जप केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. श्रीकृष्णाच्या नामाचा जप करण्याचे या काळात शुभ फळ मिळते अशी श्रद्धा आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यात भगवदगीता देखील वाचली जाते. याकाळात अन्नदान करावे असे शास्त्र सांगते.











