Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का!! नागपूरच्या देशमुखांचा पक्षाला रामराम

आपल्या तब्येतीचे कारण सांगत सलील देशमुख यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. सलील देशमुख यांनी अचानक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विदर्भात सर्वात मोठा धक्का बसला आहे.  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या तब्येतीचे कारण सांगत सलील देशमुख यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. सलील देशमुख यांनी अचानक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले सलील देशमुख? Maharashtra Politics

गेल्या काही महिन्यांपासून माझी प्रकृती खूप काही चांगली नाही, त्यामुळे काही महिने प्रकृती चांगली करुया. आणि मग जोमाने लोकसेवेत लागूया असा विचार माझ्या मनात आला. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी माझ्या कुटुंबाला खूप काही दिले आहे. खूप मानसन्मान आपल्याला पक्षात भेटला आहे. आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला लोकसभा आपल्याला करायची आहे, मोठे प्रकल्प, मोठी विकास कामं आपल्या जनतेसाठी आणली आहेत. लोकसेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. लोकांमध्ये जनसंपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला असे सलील देशमुख यांनी म्हटले.

विधानसभेत झाला होता पराभव

2024 च्या विधानसभा निवडणुकीत सलील देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काटोल मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. अटीतटीच्या या लढतीत सलील देशमुख यांचा पराभव झाला होता. यानंतर सलील देशमुख यांच्याकडे पक्ष संघटनेत कोणतंही महत्त्वाचं पद नव्हतं. आज अचानकपणे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. सलील देशमुख आता आगामी काळात इतर कोणत्या पक्षात जाणार का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्यात येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News