पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गाैरी पालवे गर्जे यांनी वरळीतील घरात आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली. गाैरी गर्जेच्या आत्महत्येनंतर धक्कादायक आरोप केली जात आहेत. पंकजा मुंडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले. गाैरी गर्जेच्या आत्महत्येनंतर तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली. मध्यरात्री वरळी पोलिसांनी गाैरी पालवे हिचा पती आणि पंकजा मुंडेचा पीए अनंत गर्जेला अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.
अनंत गर्जेला अटक; घटनेचं सत्य काय?
मृत गौरी गर्जेचे वडील म्हणतात, ” माझी मुलगी नामे गौरी हीस तिचा पती अनंत गर्जे याने लग्न झाल्यानंतर काहि कालावधीतच किरकोळ कारणावरून वाद घालण्यास तसेच किरण सिध्दार्थ इंगळे या महिलेसोबत असलेले अफेरबाबत गौरी हिरा समजल्याने तिस मानसिक व शारिरिक त्रास देण्यास सुरुवात केली व जर तिने तिचे माहेरच्या लोकांना याबाबत काही सांगितले तर स्वतःचे जीवाचे काहीतरी बरेवाईट करेल अशी धमकी देवुन तिला ब्लॅकमेल करून त्रास देत असे. तसेच अनंत गर्जे यांची बहिण शीतल राजेंद्र आंधळे हि देखील गौरी हिस जर तुझे अनंत याचेशी जमत नसेल तर त्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देत असे.”

“त्यानंतर दिनांक 22/11/2025 रोजी अनंत भगवान गर्जे यांनी मला फोन करून सांगितले की, गौरी हीने आत्महत्या केली आहे. म्हणुन माझी मुलगी गौरी हिच्या मृत्युस तिचा पती अनंत भगवान गर्जे, बहीण शीतल भगवान गर्जे-आंधळे, दीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून जावई अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या केल्याचे सांगत असला तरी त्यामध्ये खरेच आत्महत्या आहे की काही घातपात आहे? याबाबत माझी मुलगी गौरी हिंचे आत्महत्येचा कायदेशीर तपास होवून सत्य समोर येणेबाबत तपास होऊन मला न्याय मिळावा म्हणून वरील तीन लोकांविरूध्द माझी कायदेशीर तक्रार आहे,” अशी नोंद एफआयवर मध्ये आहे.
अवघ्या 10 महिन्यांचा संसार आणि शेवट
अनंत गर्जे आणि डॉ गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 7 फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लग्नाला अवघे काही महिने झाले असतानाच हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मात्र, या घटनेनंतर मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, तर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. सध्या मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस स्टेशनमध्ये असून त्यांनी सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यास सुरुवात केली असून पुढील चौकशी सुरू आहे.











