Shiv Puja : सोमवारी का केली जाते भगवान शंकराची पूजा? काय आहे यामागील कथा जाणून घ्या..

हिंदू धर्मात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. सोमवार हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

महादेवाची पूजा करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. जर दररोज मंदिरात जाणे शक्य नसेल, तर तुम्ही केवळ सोमवारीच शिवलिंगाची पूजा करून महादेवाचा आशीर्वाद मिळवू शकता. सोमवारी पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या समस्या दूर होतात.

सोमवारीच का केली जाते शिवशंकराची पूजा?

सोमवार हा भगवान शंकराला समर्पित केलेला दिवस आहे. सोमवारमधील ‘सोम’ या शब्दाचा अर्थ चंद्र आहे, जो भगवान शंकराच्या मस्तकावर अलंकार म्हणून आहे. त्यामुळे सोमवार हा भगवान शंकरासाठी प्रिय दिवस मानला जातो.

पौराणिक कथा?

पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाने सोमवार या दिवशी महादेवाची पूजा केली आणि महादेव प्रसन्न होऊन त्यांनी चंद्रदेवांना क्षयरोगापासून वाचवले. या घटनेमुळे सोमवार हा शंकराच्या पूजेसाठी विशेष दिवस मानला जातो.

माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि १६ सोमवारचे व्रत केले. या कठोर तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. या घटनेमुळे सोमवारचे महत्त्व वाढले आणि या दिवसाला विशेष महत्त्व दिले गेले. 

सोमवारी पूजा करण्याची पद्धत

  • सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रांनी पूजा करावी.
  • पूजेचा संकल्प घ्यावा.
  • शिवलिंगावर जल आणि दुधाने अभिषेक करावा.
  • दूध, पाणी, बेलपत्र, पांढरे तीळ, फुल आणि अक्षता यांसारख्या गोष्टी अर्पण कराव्यात.
  • ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.
  • शक्य असल्यास, ‘सोळा सोमवार कथा’ किंवा ‘सोळा सोमवार माहात्म्य’ ही पोथी वाचावी.
  • शेवटी महादेवांची आरती करून प्रसाद वाटप करावा.
  • उपवासाच्या दिवशी फलाहार आणि दुधाचे सेवन करू शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News