बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि चोरी-दरोड्यांच्या घटना अलीकडच्या काळात चिंतेचा विषय बनलाय. ग्रामीण आणि मुख्य रस्त्यांवरील वाढता चोरट्यांचा वावर, आर्थिक अडचणी, बेरोजगारी आणि रात्रीची अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अशा घटनांना प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून येते. दुकाने, घरे, तसेच महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले असून स्थानिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या विरोधात देखील संताप व्यक्त केला जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता बीडमधून समोर आली आहे.
चोरट्यांनी तेलंगणाच्या महिलांना लुटलं !
बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर मध्यरात्री भीषण रोड रॉबरीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील काही महिला प्रवासी या महामार्गावरून खासगी वाहनाने प्रवास करत होत्या. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अचानक वाहनाला अडवत महिलांवर हल्ला चढवला. चोरट्यांकडे बंदूक, चाकू यांसारखी धारदार शस्त्रे होती. शस्त्रांचा धाक दाखवत महिलांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याजवळील दागिने, मौल्यवान वस्तू, तसेच रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलांकडून प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली असून तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात नाकेबंदीही केली आहे. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह
दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला मात्र सातत्याने मोठे अपयश येत असल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभार किती भोंगळ आहे, हे स्पष्ट होत आहे. धाऱ्या, निर्जन पट्ट्यात घडलेल्या या धाडसी लूटप्रकरणामुळे महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वाढत्या प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
शिवाय अशा घटनांमुळे बीड आणि पर्यायाने महाराष्ट्र पोलीसांचे नाव बदनाम होत आहे. तेलंगणाच्या महिलांना लुटल्यानंतर आता या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तपासाच्या शेवटी नेमके काय निष्पन्न होते, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.











