काही दिवसांपूर्वीच 3 आणि 4 डिसेंबर रोजी होणारी पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र तो आनंद फार काळ टिकला नाही. महापालिकेने पुन्हा एकदा शहरात पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असून, 8 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून ते 9 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईत तब्बल 15 टक्के पाणी कपात होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी आता चांगलीच वाढणार आहे. एकूणच अशा पाणीकपातीमुळे किंवा पाणीपुरवठा बंद राहिल्याने मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य पूर्णपणे कोलमडत असते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.
पाणीकपात कशासाठी आणि कुठे-कुठे ?
पाणी कपातीचे कारण म्हणजे तानसा धरणातून भांडुप जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणारी 2750 मिमी व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम. हे दुरुस्तीचं काम अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे महापालिकेला पाणी कपात अपरिहार्य ठरली आहे. याच कारणासाठी 3-4 डिसेंबरदरम्यान पाणी कपात जाहीर केली होती; मात्र महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येतात, होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून ती कपात रद्द करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता परंतू आता परत त्यांना पाणी कपातीच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

आता ही कपात दोन दिवसांनी पुढे ढकलून 8-9 डिसेंबर रोजी लागू करण्यात येत आहे. त्यात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, आधी 14 विभागांत होणारी ही कपात आता 17 प्रशासकिय विभागांमध्ये लागू राहणार आहे. यामुळे शहरापासून उपनगरांपर्यंत लाखो नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या काही काळापासून, नागरिकांचे आधीच पाण्यामुळे हाल होत आहेतय त्यात आता आणखी पाणी कपात केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
कोणत्या विभागांमध्ये पाणी कपात?
शहर विभाग : ए, सी, डी, दक्षिण-जी, उत्तर-जी
पश्चिम उपनगर : एच-पूर्व, एच-पश्चिम, के-पूर्व, के-पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-उत्तर, आर-मध्य
पूर्व उपनगर : एन, एल आणि एस विभाग
मुंबईकरांनो, पाणी साठवा; पाणी जपून वापरा
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांना पाणी साठविण्याबरोबर आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे काही दिवस नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.











