इंडिगो एअरलाईन्सच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे.
मुंबई-पुणे विमानप्रवास तिकिट लाखाच्या घरात
इंडिगो एअरलाईन्सच्या संचलनाचा गोंधळ सुरूच आहे. विमान उड्डाणांमध्ये व्यत्यय कायम असल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच विमानतळांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. विमान सेवा विस्कळीत झाल्यानंतर इतर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात अचानक मोठी वाढ केली आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी विमानाच्या तिकिटाचे दर गगनाला भिडल्याचं दिसत आहे.

पुणे ते मुंबई या विमान प्रवासाच्या तिकीट दराला चक्क सोन्याचा भाव आल्याचं दिसत आहे. पुणे ते मुंबई या विमान प्रवासासाठी तिकीट दर चक्क 61000 रुपयांच्या घरात पोहोचल्याचं दिसून येत आहे. मुंबईहून थायलंडला जाण्यासाठी सुद्धा इतके तिकीट लागत नाही जितके पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी आकारले जात आहे. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
पुणे ते मुंबई या विमानासाठी तब्बल 61597 रुपये तिकीट आकारत असल्याचं दिसत आहे. पुण्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटाचे दर 27124 रुपये, तर पुण्याहून बंगळुरू येथे जाणाऱ्या विमान तिकिटाचे दर 49175 रुपये दाखवत आहे. सध्या सोन्याचा दर पाहता इतक्या पुणे – मुंबई प्रवासासाठी लागणाऱ्या 61000 रुपयांत तुम्ही साधारणत: अर्धा तोळे सोने खरेदी करु शकता.
इंडिगोचा भोंगळ कारभार; विमानसेवा विस्कळीत
इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत (11:59 वाजेपर्यंत) रद्द केल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ‘एक्स’वर जाहीर केले. यामुळे हजारो प्रवासी ताटकळले, काहींना रात्रभर विमानतळावरच थांबावे लागले. तर इंडिगोनं गेल्या चार दिवसांमध्ये 1000 हून अधिक फ्लाईट रद्द केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.











