पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर उलट परिस्थिती समोर आल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. चक्क एका महिलेने गुंगी आणणारे औषध देऊन पुरुषावर अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप कोथरूड पोलिसांकडे करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच एका घटनेचा उलगडा झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी महिला गौरी वांजळेच असून तिचे सातत्याने असे कारनामे समोर येत आहेत.
गुंगीचे औषध देत पुरूषावर अत्याचार
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका महिलेनं चक्क पुरुषावर अत्याचार केला होता. आरोपी महिलेनं गुंगीचं औषध देत तरुणाचं लैंगिक शोषण केलं होतं. एवढंच नव्हे तर तिने तरुणाचे अश्लील फोटो काढत त्याला ब्लॅकमेलही केलं होतं. आता या प्रकरणातील आरोपी महिला गौरी वांजळेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तिच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गौरी वांजळे हिने पती-पत्नीच्या कौटुंबीक वादातील प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने तिने एका व्यक्तीकडे तब्बल दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं उघड झालं आहे.

मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरी वांजळे हिच्याविरोधात एका ३८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे. या केसमध्ये ‘हायकोर्टातील वकील’ असल्याचे भासवून गौरी वांजळे हिने फिर्यादीशी जवळीक साधली. केसमध्ये मदत करते असे सांगून तिने आधी फिर्यादीला विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू केले. त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.
महिला सराईत गुन्हेगार ?
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याकडे काल एक तक्रार आली होती. या महिले विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला आणि फिर्यादी इसमाची तुळजापूर देवी मंदिरात ओळख झाली. ५ महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात ही घटना घडली होती. मार्च महिन्यात फिर्यादी आणि आरोपीचं काही साथीदार हे तुळजापूरला फिरायला गेले होते. त्यानंतर काशी विश्वनाथ इथं गेले होते. ओळखीचा फायदा घेत काशी विश्वनाथ इथं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा माझा भाऊ आहे हे सांगत काही देवाण घेवाण झाल्याची पण माहिती आहे.
या महिलेवर एक अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती समोर आली आहे. काल गुन्हा दाखल झाला असून आरोपीला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवलं आहे, अशी माहिती दिली. या घटनेमुळे पैशांसाठी नाती-गोती आणि घसरत झालेली संस्कारांची जपणूक या बाबी अधोरेखित होतात. पोलिसांकडून या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. आता आगामी काळात संबंभित महिलेवर अटकेची कारवाई होते की नाही, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.











