Weather Update: भयंकर थंडी पडणार; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांसाठी अलर्ट जारी

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात देखील थंडीच्या लाटेचा जोर चांगलाच वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. हवामान विभागाकडून देखील थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किमान तापमानामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मात्र आता आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

सर्वदूर भयंकर थंडी पडणार !

संपूर्ण देशात हिवाळ्याला सुरुवात झाली असून काही ठिकाणी तापमानात मोठी घसरण पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अशातच आता हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील इतर राज्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. रविवारी म्हणजे उद्या हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. या काळात राजधीनी दिल्ली-एनसीआरमध्ये किमान तापमान 3.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवस दाट धुक्याची चादरही पहायला मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. या दोन्ही ठिकाणी तापमान 9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. आता 7 डिसेंबरला नागपूर, गोंदिया आणि यवतमाळला शीत लहरींचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागात किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. एकुणच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात थंडी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News