हिंदू धर्मानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या कामाची सुरूवात केली जाते, तेव्हा प्रथम भगवान गणेशाची प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला येणारी चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित असते. या दिवशी उपवास आणि पूजा करून भक्त गणेशाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. संकष्टी चतुर्थीला, भक्त उपवास करतात आणि रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडतात. श्री गणेशाला हत्तीचे मस्तक मिळाल्याची कथा आहे. आज जाणून घेऊया काय आहे कथा…
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
संकष्टी चतुर्थी गणपतीला समर्पित आहे, जो विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. या दिवशी, भक्त भगवान गणेशाची पूजा करतात आणि त्यांच्यासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थी, ज्याचा अर्थ ‘संकट दूर करणारी चतुर्थी’ असा आहे, गणेशाला समर्पित आहे. या दिवशी, स्त्रिया विशेषत: आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात.

श्री गणेशाला हत्तीचे मस्तक कसे मिळाले ?
महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचा पुत्र म्हणून गणेशाची ख्याती आहे. पार्वती देवीने सुंदर अशी मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला, हे सर्वश्रुत आहे. गणपती हा पार्वती देवीचा अत्यंत लाडका होता. एक दिवस स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना पार्वती देवीने गणेशाला केली. आईचा आदेश शिरसावंद्य मानून गणपती दाराजवळ बसून राहिला. तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले. गणपती हा आपलाच पुत्र असून, पार्वती देवीच्या आदेशावरून तो तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती. महादेवांनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता, गणपतीने त्यांना अडवले. सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावले. मात्र, काही केल्या तो ऐकेना. आईने दिलेले काम चोखपणे पार पाडायचे, असा संकल्पच त्याने घेतला होता. महादेवांनी हर तऱ्हेने गणपतीला समजावले. मात्र, तो हटला नाही. शेवटी पिता-पुत्रामध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. महादेवांनी त्रिशुळाचा जोरदार प्रहार गणपतीवर केला.
महादेवांच्या त्रिशुळ प्रहारामुळे गणपतीचे मूळ शीर धडावेगळे झाले. काही वेळाने पार्वती देवी तेथे आली. गणपतीला निपचित पडलेले पाहून त्या प्रचंड दुःखी झाल्या. अत्यंत क्रोधीत झाल्या. माझ्या पुत्राला पुन्हा जीवंत केले नाही, तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन, असे पार्वती देवींनी महादेवांना बजावले. शंकरांनी नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले. खूप पायपीट केल्यानंतर त्यांना अखेर त्यांना एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक घेऊन ते शंकरांकडे आले. महादेवांनी हत्तीचे मस्तक त्या बालकांच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान दिले. यानंतर सर्व देवांनी गणपतीला अनेक शक्ती, अस्त्र-शस्त्रे प्रदान केली.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











