हिंदू धर्मात दत्तजयंतीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी दत्तात्रेयांची पूजा आणि उपासना केल्याने ज्ञान, शांती आणि समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी भक्त दत्त पादुकांची किंवा मूर्तीची पूजा करतात आणि काही ठिकाणी दत्त परिक्रमादेखील करतात. भक्त ‘गुरुचरित्र’ ग्रंथाचे पठण करतात आणि भजन-कीर्तनाद्वारे दत्त महाराजांची भक्ती करतात. या दिवशी दत्त व्रत आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.
दत्त जयंतीचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते. २०२५ मध्ये दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने, हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरणासाठी अधिक शुभ मानला जातो. दत्त जयंतीनिमित्त भक्त त्यांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात, स्तोत्रपठण करतात आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राचा जप करतात.

दत्त जयंती पूजेसाठी मुहूर्त
दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5 वाजून 14 मिनिटं ते 6 वाजून 06 मिनिटांपर्यंत आहे. यावेळी अभिजित मुहूर्त असणार नाही. तर संधिप्रकाश मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 58 मिनिटं ते 6 वाजून 24 मिनिटांपर्यंत असेल. अमृत काळ दुपारी 12 वाजून 20 मिनिटं ते 1 वाजून 58 मिनिटांपर्यंत असेल.
दत्त जयंतीला या पद्धतीने करा पूजा
- मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आवरुन झाल्यानंतर उपवास आणि पूजा करण्याचे व्रत घ्या.
- दत्त जयंतीची पूजा करताना एका चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगांचे वस्त्र पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर दत्ताची मूर्ती ठेवा.
- त्यानंतर दत्तात्रेयांना फुले आणि हार अर्पण करा.
- यानंतर, शुद्ध तुपाचा दिवा लावा.
- भगवान दत्तात्रेयांना गुलाल, अबीर, चंदन, इत्यादी अर्पण करा.
- आरती करुन घ्या आणि नैवेद्य अर्पण करा.
- शक्य असल्यास, पूजेनंतर गरजू लोकांना अन्न, धान्य, कपडे इत्यादी दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











