दत्त जयंतीनिमित्त औदुंबर वृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते कारण दत्तगुरुंचा वास या झाडात असतो असे मानले जाते. औदुंबर वृक्ष कल्पवृक्षाप्रमाणे मनोकामना पूर्ण करणारा आणि दत्त महाराजांच्या कृपेचा वाहक मानला जातो. दत्त जयंतीनिमित्त या झाडाची प्रदक्षिणा करणे, पूजा करणे किंवा समिधा म्हणून त्याच्या सुकलेल्या काड्यांचा वापर करणे भक्तांसाठी फलदायी ठरते. काय आहे यामागील पौराणीक कथा जाणून घेऊयात..
दत्तगुरूंचा निवास
असे मानले जाते की औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्त महाराजांनी साधना केली होती आणि त्यामुळेच या वृक्षाला दत्ताचे स्वरूप मानले जाते.
कल्पवृक्ष
औदुंबर वृक्ष हा ‘कल्पवृक्ष’ मानला जातो, कारण त्याच्या सेवेने अनेक मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. या वृक्षाची प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो आणि जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात, अशी श्रद्धा आहे.
औदुंबर वृक्षाच धार्मिक महत्त्व
औदुंबर वृक्षाचे धार्मिक महत्त्व आहे, कारण ते भगवान दत्तत्रेयांचे निवासस्थान मानले जाते, कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते आणि त्याचे अनेक फायदे आहेत. औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा केल्याने दत्तात्रेयांचा आशीर्वाद मिळतो, त्याच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून वापरल्या जातात आणि या वृक्षाची सेवा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
पौराणीक कथा
पौराणिक कथेनुसार, हिरण्यकशिपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही मारु शकत नाही अर्थात त्याचा मृत्यु येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता. पण याने तो फार उन्मत्त झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता. त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णूभक्त होता. सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकशिपुने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही. अखेर कंटाळून हिरण्यकशिपु प्रल्हादाला म्हणाला, की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग ? तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहे. त्यावर हिरण्यकशिपु म्हणे की मग या खांबात आहे का? तर बालक म्हणाला होय…
हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्यकशिपुने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानवशरीरासारखा अशा नृसिंह रूपांत श्री विष्णु बाहेर पडले. त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपुला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखांत भरले. आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नृसिंहंना आपली नखे खूपसावयाला सांगितले. त्या औषधाचा परिणाम झाला व त्यातील रसाने त्यांची आग शांत झाली. तेव्हापासून औदुंबराच्या वृक्षाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.. तेव्हा विष्णु देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला- की हे औदुंबर वृक्ष, आपल्यावर सदैव फळे येतील. आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिध्द होतील आणि आपली पूजा, सेवा करणार्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शनमात्रने उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात.
औदुंबराचे फूल दिसणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. असे म्हणतात की, ज्या भाग्यवान व्यक्तीला ते फूल दिसते, त्याला साक्षात दत्तगुरूंची कृपा लाभते. अनेक दत्त मंदिरांच्या परिसरात औदुंबराचे झाड आढळते, जे दत्तगुरूंच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)