मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणून या महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्यात गुरुवारचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि धन-धान्य नांदते, असे मानले जाते. हे व्रत करणाऱ्यांना लक्ष्मी आणि विष्णूचा आशीर्वाद मिळतो, असेही मानले जाते.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व
मार्गशीर्ष महिना देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि या महिन्यात गुरुवारी विशेष पूजा केली जाते, ज्याला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत म्हणतात. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केल्याने त्यांच्या कृपेचा वर्षाव होतो. या व्रतामुळे घरात सुख-समृद्धी आणि आर्थिक भरभराट होते. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू होते आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते.

मार्गशीर्ष गुरुवारचा घट कसा मांडाल?
- गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालावे लागतील.
- त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी.
- महालक्ष्मी व्रत पूजेसाठी देवघराच्या बाजूला चौरंग ठेवावा.
- चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी.
- चौरंगावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
- मग एक तांब्याचा कलश घ्यावा त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे.
- कलशाला हळदकुंकू लावावे व त्यात एक नारळ ठेवावा.
- काहीजण या नारळाला सजवून देवीचे रूप देतात. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नारळ सजवावा किंवा नुसता ठेवावा. चौरंगावर एका ठिकाणी पाच फळे ठेवावीत.
- एकीकडे विड्याची पाने व त्यावर देवीचा शृंगार ठेवावा.
- त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देखील ठेवून त्याची पूजा करावी.
- देवीला हळदीकुंकू व्हावे. हार घालावा फुले अर्पण करावीत व फुलांची वेणी देखील घालावी.
- मग धूप दीप अगरबत्ती लावावी. अशा प्रकारे पूजेची मांडणी केली जाते.
- कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. तुम्ही यथाशक्ती नैवेद्य दाखवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











