एकादशी अन् दुप्पट खाशी ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी उपवासाचे पदार्थ मनसोक्त खातो. अशावेळी काय खावे किंवा आहार कसा असावा हा सगळ्यात मोठा प्रश्न गृहीणींसमोर उभा राहतो. जास्त विचार करू नका. आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत रताळ्याचा पराठा. चला तर मग जाणून घेऊया रताळ्याचा पराठा कसा बनवायचा …
साहित्य
- २-३ मध्यम आकाराचे उकडलेले रताळे
- १/२ कप साबुदाणा पीठ (किंवा राजगिरा पीठ)
- १-२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
- १ चमचा जिरे
- १/४ कप शेंगदाण्याचा कूट
- चवीनुसार मीठ (उपवासासाठीचे मीठ)
- तूप किंवा तेल पराठा भाजण्यासाठी
कृती
- उकडलेले रताळे चांगले मॅश करून घ्या. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
- मॅश केलेल्या रताळ्यामध्ये साबुदाणा पीठ (किंवा राजगिरा पीठ), हिरवी मिरची, जिरे, शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घाला.
- सर्व साहित्य एकत्र करून मऊसूत पीठ मळून घ्या.
- पिठाचे छोटे गोळे करून घ्या. एका प्लास्टिकच्या कागदावर किंवा पोळपाटावर थोडे तूप किंवा तेल लावून प्रत्येक गोळा पराठ्याच्या आकारात थापून घ्या.
- तव्यावर थोडे तूप किंवा तेल गरम करा. पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- गरमागरम रताळ्याचा पराठा उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.












