तुळशी विवाहापासून शुभ कार्यांना सुरुवात होते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाह हा देवउठणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो. या दिवसाला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्री हरी आणि तुळशी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया पूजा पद्धत आणि तुळशी विवाहासाठी काय साहित्य लागणार, याबद्दल जाणून घेऊयात…
तुळशी विवाहसाठी साहित्य
तुळशीची कुंडी
धोतऱ्याच्या आणि एरंड्याच्या झाडाची फांदी
आंब्याच्या झाडाचे पान, विड्याची पाने
आवळा, चिंच, बोरं
हळकुंडे
विड्याची पाने
सुपार्या
खोबर्याच्या वाट्या
हळद-कुंकू आणि तांदूळ
ऊस
नारळ
पंचा / अंतरपाट
हार
सुगंधित फुले
पाट
कृष्णाची छोटी मूर्ती
मंगलाष्टका पुस्तक
डोक्यात घालण्यासाठी टोपी
प्रसादासाठी – ऊस, कुरमुरे, लाह्या, बत्ताशे, शेवबुंदी, फराळातील पदार्थ इत्यादी.

तुळशी विवाहाची तयारी कशी करावी?
- दाराबाहेर केर काढून घ्या.
- तुळशीचे वृंदावन सारवून स्वच्छ करा.
- तुमच्या आवडीची छान रांगोळी काढा.
- रांगोळी काढून झाल्यानंतर तुळस लावलेली कुंडी सजवायला घ्या.
- सगळ्यात पहिल हळद, मग कुंकूचे ठिपके कुंडीवर सगळ्या बाजूने लावून घ्या.
- त्यानंतर तुळशीत चिंचा, आवळे आणि ऊस खोचून ठेवा.
- नंतर आजूबाजूचा परिसर सुंदर रांगोळी आणि फुलांनी सजवून घ्या.
- त्यानंतर पाट अक्षता आणि फुलांनी सजवून घ्या आणि पाटाच्या मधोमध कृष्णाची छोटी मूर्ती ठेवा .
- तुळशीसमोर पंचा धरून पलीकडे हातात पाट घेऊन एका व्यक्तीला उभे करावे.
- मंगलाष्टके म्हणावी नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्या, वाद्ये वाजवावी.
- त्यानंतर लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा असणाऱ्याने एक फुलांचा हार कृष्णाला व दुसरा फुलांचा हार तुळशीला घालावा.
- नंतर नारळ फोडून तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी.
- त्यानंतर प्रसाद वाटावा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)