दिवाळी म्हटलं की प्रत्येकाला दिवाळीचा फराळ, मिठाई आणि फटाके आठवतात. पण, यात आणखी एक गोष्ट अशी आहे; जी दिवाळीमध्ये आवर्जून केली जाते आणि ती म्हणजे अभ्यंगस्नान. दिवाळीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. पहाटे उठून अंगाला तेल व उठणे लावून, मग अंघोळ केली जाते आणि त्यालाच अभ्यंगस्नान, असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला फार महत्त्व आहे. दिवाळी हा एकच सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. नरकचतुर्दशी दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ असते. जाणून घ्या अभ्यंगस्नान कसे करावे? महत्व आणि कथा.
अभ्यंगस्नानाचे धार्मिक महत्त्व
दिवाळीतील अभ्यंगस्नान हे धार्मिक आणि आरोग्यदायी परंपरा आहे, ज्यात नरक चतुर्दशीच्या पहाटे अंगाला तेल व उटणे लावून स्नान केले जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करणे हे नरकातील पापवासना आणि अहंकाराचा नाश करण्याचं प्रतीक आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि शरीराला शुद्ध करण्यासाठी हे उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार, अभ्यंगस्नान हे आरोग्यासाठी एक वरदान असून, ते दीर्घकाळ आरोग्य सुधारण्यास मदत करते.

पौराणिक कथा
पौराणिक कथेप्रमाणे नरकासुर नावाचा एक बलाढ्य राजा उन्मत्त झाला आणि त्यांनी सर्वत्र उच्छाद मांडला तेव्हा इंद्राने नरकासुरापासुन सुटकेसाठी भगवान कृष्णाची प्रार्थना केली. कृष्णाने नरकासुराचा वध केला. मरताना नरकासुराला पश्चात्ताप झाला आणि त्यांनी कृष्णाकडे वर मागितला की, आजच्या दिवशी म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी या दिवशी जो अभ्यंगस्नान करील त्याला नरक यातना होऊ नयेत. भगवान श्रीकृष्णाने ते मान्य केले आणि या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा सुरू झाली. अशी ही अभ्यंगस्नानाबाबत सांगितल्या जाणाऱ्या अनेक कथांपैकी एक कथा आहे.
अभ्यंगस्नान कसे करावे?
- नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून, ब्रह्म मुहूर्तावर हे स्नान करतात.
- सर्वप्रथम अंगाला तेल लावून मालिश केली जाते, त्यानंतर सुगंधी उटणे लावले जाते.
- नंतर गरम पाण्याने स्नान करून शरीर स्वच्छ धुतले जाते.
- उटणे लावल्यावर साबण वापरणे टाळावे, असे शास्त्र सांगते.
- अंघोळ केल्यानंतर ‘कारेटं’ अंगठयाने फोडण्याची प्रथा आहे.
- अभ्यंगस्नान झाल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावे.
- त्यानंतर फराळाचं पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवून आपण प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्य मिळून एकत्र ग्रहण करावे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











