Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाला बनवा पारंपरिक नैवेद्य, वाचा सोपी रेसिपी

Asavari Khedekar Burumbadkar

भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात, तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून प्रसाद अर्पण केला जातो.  तुळशी विवाहाच्या शुभ प्रसंगी  गोड पदार्थ आणि उसाच्या रसाचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यासोबतच, पंचामृत आणि इतर पारंपरिक मिठाई व फळे यांचाही नैवेद्य म्हणून वापर केला जातो. चंद्रकला ही खव्यापासून बनवलेली एक पारंपारिक मिठाई आहे, जी विशेषतः सणासुदीला नैवेद्य म्हणून केली जाते, चला तर मग जाणून घेऊया चंद्रकला कशी बनवायची.

साहित्य

  • मैदा
  • तूप
  • खवा
  • सुकामेवा
  • वेलची पावडर
  • साखर
  • पाणी
  • तेल

कृती

  • सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मैदा घ्या आणि यात थोडं थोडं करत तूप घाला, आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्या व ओल्या कपड्याने झाकून एका बाजूला ठेवून द्या.
  • यानंतर, एक पॅन गरम करा, त्यात खवा २-३ मिनिटे परतून घ्या. त्यात सुकामेवा आणि वेलची पावडर चांगले मिसळा.
    जेव्हा खवा थंड होईल तेव्हा साखर घालून एकजीव करून घ्या.
  • मैद्याचे छोटे छोटे गोळे करून पुरीप्रमाणे लाटून घ्या. त्यात खव्याचे सारण घाला. वरून दुसरी पुरी ठेवून गोल आकार देत कडांना हलक्या हाताने दाबत करंजीसारखी नक्षी तयार करा.
  • कढईत तेल तापत ठेवा. यात चंद्रकळेला डीप फ्राय करून घ्या.
  • नंतर साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात काही वेळाकरता मुरवत ठेवा.
  • चंद्रकळा मिठाई तयार आहे ! तुम्ही हिला केसर, चांदीचे वर्ख आणि ड्रायफ्रूट्सने सजवू शकता.

ताज्या बातम्या