हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे. अन्नपूर्णा जयंती ही अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे. अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरातील ऐश्वर्य वाढते.
अन्नपूर्णा प्रसन्न राहो असे का म्हणतात ?
अन्नपूर्णा म्हणजे ‘अन्नाने परिपूर्ण’. ही देवी अन्नाची देवी मानली जाते आणि तिच्या कृपेमुळे घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. “अन्नपूर्णा प्रसन्न राहो” असे म्हणण्यामागे असे मानले जाते की देवी अन्नपूर्णा अन्न आणि समृद्धीची देवी आहे आणि तिची कृपा घरात नेहमी असावी यासाठी ही प्रार्थना म्हंटली जाते. या प्रार्थनेमुळे घरात कधीही अन्नाची किंवा धान्याची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.

पौराणिक कथा
एका कथेनुसार, जेव्हा भगवान शिवाने संपूर्ण विश्वाला अन्नासह माया म्हटले, तेव्हा अन्नपूर्णेचा कोप झाला आणि ती अदृश्य झाली. अन्नपूर्णा अदृश्य झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळ पडला आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. भगवान शिवाला आपली चूक समजल्यानंतर, शिवाने अन्नासाठी भिक्षेचा कटोरा घेऊन अन्नपूर्णेला शोधले. या घटनेनंतर, अन्न हे जीवनासाठी किती आवश्यक आहे, हे शिवाला समजले आणि देवी अन्नपूर्णा पुन्हा प्रकट झाली, नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी पार्वतीला ‘तू अन्नपूर्णा’ असा आशिर्वाद दिला. म्हणूनच, घरात अन्न-धान्याची समृद्धी आणि अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि तिची प्रसन्नता मागितली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











