हिंदू धर्मात चंपाषष्ठीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील ही तिथी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा म्हणजेच खंडेराया यांना समर्पित आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात हे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत खंडोबा मानले जाते, त्यामुळे हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.
चंपाषष्ठीला का केला जातो तळी भंडारा?
भगवान महादेवाचे अवतार खंडोबा यांनी ‘मणि आणि मल्ल’ या दैत्यांचा पराभव केला होता. या लढाईत त्यांना सहा दिवसांचा कालावधी लागला आणि मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठीला त्यांचा विजय झाला. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ऋषिमुनींनी मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला होता. त्याचेच प्रतीक म्हणून तळी भरली जाते. त्यामुळे चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरली जाते. हा एक कुळाचार मानला जातो.

तळी भंडारा विधी
ताम्हणात विड्याची (नागवेलीची) पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आदी साहित्य घेऊन तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये घरातील पुरुष मंडळीनी एकत्र येत ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’ च्या गजरात ही तळी वर खाली उचलतात. त्यानंतर जमीनीवर पान ठेवून तळी ठेवली जाते. देवाला भंडार वाहिला जातो. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा तीन वेळा थाळी उचलून खाली करून ‘सदानंदाचा येळकोट, चांगभले’ असा जयजयकार केला जातो. शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. आरती करून भंडारा आणि गुळ-खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











