महाराष्ट्रात अनेक लोकांच्या घरी लग्नानंतर जोडप्यांच्या घरी सत्यनारायणाची पुजा घातली जाते, त्यानंतर नवी जोडपी देवदर्शनासाठी जातात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाला ओळखलं जातं. बऱ्याच मराठी कुटुंबाचं कुलदैवत खंडेराया आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार नवविवाहित जोडप्याने कुलदैवताचे आशीर्वाद घेणं महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला माहितीये का लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? चला तर मग यामागील कारण जाणून घेऊयात.
चंपाषष्ठीचे महत्त्व
महाराष्ट्रात चंपा षष्ठीला खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी असे म्हटले जाते. चंपाषष्ठीचा दिवस शंकराचा अवतार असलेल्या खंडोबाच्या दैत्यावरील विजयाचा दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो.

लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात?
जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्याची प्रथा फार जुनी आहे. जेजुरीचा खंडेराया हा अनेकांच्या घराचा कुलदैवत आहेत. त्यामुळे बहुतांश लोक खंडोबाच्या दर्शनासाठी जातात. पण प्रमुख कारण म्हणजे खंडेराया हे शिवाचं रुप, तर म्हाळसा देवी ही पार्वतीचं रुप मानले जाते. त्यामुळे शंकर आणि पार्वतीसारखा आपला संसार सुखी व्हावा, असा त्यामागील उद्देश असतो. जेजुरीला दर्शानासाठी आल्यावर भंडाऱ्याची उधळण केली जाते. शिवाय अनेक लोक तेथे लग्नानंतरचा गोंधळ देखील घालतात. जेजुरीला नवीन जोडप्यांना घेऊन जाऊन बरेच पूजाविधी केले जातात.











