Champa Shashthi 2025 : चंपाषष्ठी कधी? जाणून घ्या खंडोबा नवरात्री विधी आणि महत्त्व

Asavari Khedekar Burumbadkar

मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी 26 नोव्हेंबरला असणार आहे. चंपाषष्ठीचा उत्सव महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात येतो.

चंपाषष्ठी महत्त्व

चंपाषष्ठी हे भगवान खंडोबा किंवा मार्तंड भैरवाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. या दिवशी, खंडोबाने मल्ल आणि मणी या राक्षसांचा वध केला होता, ज्याचे स्मरण म्हणून षष्ठी तिथीला हा उत्सव साजरा करतात. या उत्सवामध्ये सहा दिवस पूजा केली जाते, ज्यामध्ये वांग्याचे भरीत आणि भाकरी नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.

चंपाषष्ठी कधी आहे?

पंचांगानुसार, मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी म्हणजेच चंपषष्ठी तिथी 25 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजून 56 मिनिटांनी सुरू होईल. आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 12 वाजून 01 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, चंपाषष्ठी 26 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी होईल.

चंपाषष्ठी पूजा विधी

चंपाषष्ठी पूजा विधीमध्ये मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला भगवान खंडोबाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी खंडोबाच्या नवरात्राची समाप्ती होते आणि खंडोबाने मणी-मल्लाचा वध केल्याचे स्मरण केले जाते.

  • मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते आणि षष्ठीला चंपाषष्ठी म्हणून साजरी करतात.
  • या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड भैरव या रूपात खंडोबाची पूजा केली जाते.
  • उत्सव काळात मार्तंडदेवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात.
  • वांग्याचे भरीत, गव्हाचा रोडगा आणि इतर धान्यांपासून बनवलेले ठोंबरे यांचा नैवेद्य दाखवतात.
  • चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते आणि त्यानंतर आरती केली जाते.
  • तळी भरताना ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी आरती म्हटली जाते.

टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या