Moon On Shiva Head : शंभू महादेवाच्या मस्तकावर चंद्र का असतो? जाणून घ्या पौराणिक कथा…

शिवाचे उग्र तेज चंद्राच्या शीतलतेने संतुलित केले गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर चंद्र विराजमान झाला. हे उग्रता आणि शांती या दोन्हींचा समन्वय दर्शवते. चंद्र हा प्रकाश-अंधाराचे प्रतीक आहे

हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष महत्त्व आहे. यात महेश म्हणजेच शिवाला देवांचे देव महादेव म्हटले जाते. महादेव हे शक्तीचे स्वरुप मानले जातात. युगानुयुगांपासून जगात त्यांची पूजा केली जात आहे. जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे, महादेवाला एक क्षणात जगाचा विनाश करणारा तर दुसरीकडे जगाचा जीवनदाता देखील मानले जाते.  शंभू-महादेवाला बेलपत्र, भांग धतुरा, दुग्धाभिषेक इत्यादी खूप आवडतात. या सगळ्यामागे काही पौराणिक कथा सांगितल्या जातात. महादेवाच्या डोक्यावर चंद्र तुम्ही पाहिला असेल. यामागेही एक आख्यायिका आहे. जाणून घेऊया…

शांतता आणि शीतलता

शिवाचे उग्र तेज चंद्राच्या शीतलतेने संतुलित केले गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर चंद्र विराजमान झाला. हे उग्रता आणि शांती या दोन्हींचा समन्वय दर्शवते. चंद्र हा प्रकाश-अंधाराचे प्रतीक आहे. महादेवाने चंद्राला मस्तकावर धारण केल्याने उग्रता आणि शांती यांच्यात संतुलन साधले जाते.

समुद्रमंथन कथा

पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष शंकरांनी प्राशन केले होते. विष प्यायल्याने भगवान भोलेनाथांचे शरीर खूप गरम होऊ लागले. त्यामुळे त्यांना थंडावा देण्याची नितांत गरज होती. विषामुळे त्यांचे संपूर्ण शरीर उग्र होऊ लागले. शंकराच्या उग्र रूपामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी, चंद्राने शंकराच्या डोक्यावर निवास केला. यामुळे शिवाच्या उग्रतेत शीतलता आणि शांतीचा मेळ साधला गेला आहे

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, दक्ष प्रजापतीने आपल्या २७ मुलींचे लग्न चंद्र देवाशी लावून दिले, पण चंद्र केवळ रोहिणीवर अधिक प्रेम करत होते. त्यामुळे इतर कन्यांनी वडिलांकडे तक्रार केली. रागावलेल्या दक्षाने चंद्राला क्षय रोगाचा शाप दिला. यामुळे चंद्राचे टप्पे कमकुवत होऊ लागले. चंद्राची ही दशा पाहून नारदजींनी चंद्राला महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, चंद्राने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्याने सुरु केली. चंद्राच्या या तपश्चर्येने महादेव प्रसन्न झाले. आणि महादेवाच्या कृपेने पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण रुपात प्रकट झाला आणि त्याला त्याच्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळाली. सर्व संकटांपासून मुक्ती मिळल्याने चंद्राने महादेवाला विनंती केली की, त्यांनी आपल्याला त्यांच्या डोक्यावर धारण करावे. चंद्रची ही विनंती महादेवाने मान्य केली आणि तेव्हापासून महादेवांनी चंद्राला डोक्यावर धारण केले.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News