धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा आवर्जून केली जाते. ही पूजा केल्यानंतर त्यांना खास नैवेद्य दाखवला जातो. आज या धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्ही देखील नैवेद्य दाखवा. त्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. परंतु, धनत्रयोदशीच्या दिवशी गूळ, तूप आणि तांदूळ यांचे खास महत्व आहे. त्यामुळे, या गोष्टींचा वापर करून तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता. चला तर मग खास धनत्रयोदशीच्या नैवेद्यासाठी आपण गुळाच्या लापशीची रेसिपी जाणून घेऊयात…
साहित्य
- १ कप लापशी रवा (गव्हाचा रवा)
- २ ते ३ चमचे तूप
- १.५ ते २ कप पाणी
- १ कप गूळ (किसलेला)
- १/२ चमचा वेलची पूड
- आवडीनुसार सुका मेवा (काजू, बदाम, मनुका)
- तळलेल्या खोबऱ्याचे काप
कृती
- एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करा.
- त्यात लापशी रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंगावर भाजून घ्या. भाजलेला रवा एका भांड्यात काढून घ्या.
- त्याच भांड्यात पाणी घालून गरम करा. पाणी उकळल्यावर त्यात भाजलेला रवा हळूहळू मिसळा. गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या.
- रवा शिजल्यावर त्यात किसलेला गूळ आणि वेलची पूड घाला.
- गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि लापशी मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
- तयार गुळाच्या लापशीमध्ये सुका मेवा (काजू, बदाम, मनुका) आणि तळलेल्या खोबऱ्याचे काप घालून गरमागरम सर्व्ह करा.





