अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो. पंचांगानुसार, यंदा 2 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याला विजयादशमी असंही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. पौराणिक कथेनुसार,या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडीकेचं रुप धारण करुन महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तसेच, याच दिवशी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने त्याच्या शस्त्रांची पूजा केली. त्याच वेळी महिषासुराशी युद्धासाठी देवतांनी मिळून दुर्गा देवीच्या शस्त्रांची पूजा केली. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजनाला विशेष महत्त्व आहे. यंदा शस्त्र पूजनासाठी शुभ मुहूर्त कोणता? जाणून घेऊया….
दसऱ्याच्या शस्त्र पूजनाचा शुभ मुहूर्त
शस्त्र पूजनासाठी शुभ मुहूर्त २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ९ मिनिटांपासून ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असेल. दसरा पूजनासाठी हा सर्वात उत्तम मुहूर्त मानला जातो. या वेळेत शस्त्र पूजन करणे खूप शुभ राहील. विजय मुहूर्तावर जे काही नवीन किंवा शुभ काम करेल, त्याला अनेक पटींनी जास्त शुभ फळ मिळते असे मानतात. दसरा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असल्याने या शुभ मुहूर्तावर तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता किंवा नवीन वस्तू खरेदी करू शकता. हा मुहूर्त नवीन शुभ कार्यांसाठी अत्यंत फलदायी मानला जातो.

दसऱ्याला शस्त्र पूजेची पद्धत
दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावं. अंघोळीनंतर चांगले कपडे घाला. यानंतर विजय मुहूर्तावर शस्त्रांची पूजा सुरू करा. सर्व शस्त्रांना स्वच्छ धुऊन घ्यावे. सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून शुद्ध करा. त्यानंतर शस्त्रांना हळदी-कुंकू लावावे. यानंतर, शस्त्रांवर फुले, अक्षता आणि शमीची पाने अर्पण करून त्यांची पूजा करावी.दसऱ्याचा दिवस हा विजय मुहूर्त असतो आणि याच शुभ मुहूर्तावर शस्त्र पूजनाची परंपरा आहे. दसऱ्याला नवीन काम सुरू करण्यापूर्वी शस्त्रांची पूजा केल्याने कामात यश आणि सुरक्षितता मिळते, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











