आज सोमवार, 22 सप्टेंबरपासून देशभरात नवरात्री उत्सवाची सुरूवात झाली आहे. यंदा २ ऑक्टोबरला विजयादशमी दसरा साजरा होणार आहे. यामध्ये भारतातील सर्वात मोठा दसरा सोहळा कर्नाटकातील म्हैसूर शहरात साजरा केला जातो. कर्नाटकातील म्हैसूरचा दसरा हा जगप्रसिद्ध उत्सव मानला जातो. दहा दिवस चालणारा हा सोहळा आपल्या वैभवासाठी, ऐतिहासिक परंपरेसाठी आणि सांस्कृतिक मांडणीसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे, या उत्सवाला “राजोत्सव” असेही म्हटले जाते कारण हा उत्सव मुळात विजयनगर साम्राज्याच्या काळापासून राजघराण्याच्या आश्रयाखाली साजरा होत आला आहे.
म्हैसूरच्या दसऱ्याच्या इतिहास नेमका काय?
म्हैसूरच्या दसऱ्याचा इतिहास १५व्या शतकापर्यंत मागे जातो. विजयनगर साम्राज्याचे संस्थापक विजयराय यांनी हा उत्सव राजकीय ताकद, धार्मिक श्रद्धा आणि जनतेशी नाते दृढ करण्यासाठी सुरू केला होता. नंतर वाडियार घराण्याने या परंपरेला पुढे चालना दिली. म्हैसूरच्या अंबा विलास पॅलेसमध्ये देवी चामुंडेश्वरीची पूजा करून या उत्सवाची सुरुवात होते. देवीने महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले, त्या विजयाची आठवण म्हणून हा दसरा विशेष उत्साहाने साजरा होतो.

म्हैसूरचा दसरा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उत्सव शक्तीची, न्यायाची आणि धर्माच्या विजयाची जाणीव करून देतो. लोकमानसात शक्तीदेवतेची आराधना करून जीवनात सकारात्मकता, शौर्य आणि सद्गुण अंगीकारण्याचा संदेश दिला जातो. तसेच, हा उत्सव कर्नाटक राज्याची संस्कृती, कला आणि परंपरा जगभर पोहोचवतो. यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळते आणि आर्थिक दृष्ट्याही तो उपयुक्त ठरतो.
म्हैसूरमधील दसरा कसा साजरा केला जातो?
- दरबार सोहळा: म्हैसूर पॅलेस राजेशाही रोषणाईने उजळतो. राजघराण्याचे वारसदार पारंपरिक पोशाखात दरबार भरवतात.
- चामुंडेश्वरी पूजन: दसऱ्याच्या काळात चामुंडी हिलवर देवीची विशेष पूजा केली जाते.
- सांस्कृतिक कार्यक्रम: नृत्य, संगीत, लोककला, नाटक, काव्यवाचन अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांनी शहर रंगून जाते.
- जम्बू सवारी हा दसऱ्याचा मुख्य आकर्षण आहे. सजवलेल्या हत्तीच्या पाठीवर सुवर्ण हौदमध्ये देवी चामुंडेश्वरीची मूर्ती बसवली जाते. हत्ती, घोडे, उंट, बँड, लोककलावंतांचा मिरवणुकीत सहभाग असतो. लाखो पर्यटक या मिरवणुकीचे दर्शन घेतात.
- पॅलेसची रोषणाई: संपूर्ण म्हैसूर पॅलेस सुमारे एक लाखाहून अधिक बल्बांनी सजवला जातो. रात्रीचे दृश्य अत्यंत मोहक दिसते.
- प्रदर्शने आणि मेळावे: स्थानिक हस्तकला, खाद्यपदार्थ आणि उद्योगांना चालना देण्यासाठी भव्य मेळावे भरवले जातात.
म्हैसूरचा दसरा हा कर्नाटकाच्या सीमांपलीकडे जाऊन जगभर ओळखला जातो. विविध देशांतील पर्यटक या काळात म्हैसूरला भेट देतात. सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी आणि भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवण्यासाठी हा उत्सव महत्त्वाचा ठरतो. म्हैसूरचा दसरा हा फक्त धार्मिक सोहळा नसून, तो इतिहास, परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम आहे. धर्माच्या विजयाची आठवण करून देतानाच तो समाजात एकता, आनंद आणि संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देतो. त्यामुळेच म्हैसूरचा दसरा हा “जगाचा दसरा” म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तुम्हाला जर हा दसरा प्रत्यक्ष कधी अनुभवायचा असेल, तर एकदा म्हैसूरला दसऱ्यामध्ये नक्की भेट द्या…











