Ganesh Chaturthi Recipes Marath: गणेश चतुर्थीची सर्वांनाच अनेक दिवसांपासून आतुरता लागलेली आहे. आज २७ ऑगस्टला बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. डेकोरेशनपासून बाप्पाच्या आवडत्या नैवेद्यापर्यंत सर्वच गोष्टींची तयारी केली जात आहे.
घरोघरी बायकांना बाप्पाच्या नैवेद्यामध्ये काय-काय बनवायचे याचे वेध लागले आहेत. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी भक्तिभावाने तयारी केली जात आहे. बाप्पाच्या प्रसादामध्ये मोदकाला विशेष महत्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्यासोबतच आणखी एका गोष्टीला विशेष महत्व आहे आणि ते म्हणजे खिरापत होय. गणेश चतुर्थीमध्ये खिरापत आवडीने खाल्ली जाते. आज आपण १० दिवस टिकणाऱ्या खिरापतीची सोपी आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत.
खिरापत बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
खोबरे – १ वाटी
पिठीसाखर- अर्धी वाटी
वेलची पूड- १ चमचा
तूप- २ चमचे
ड्रायफ्रूट्स- काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे
खिरापत बनवण्याची पारंपरिक रेसिपी-
बाप्पाच्या प्रसादासाठी खिरापत बनवताना सर्वप्रथम एका कढईमध्ये खोबऱ्याचा किस घेऊन मंद आचेवर भाजून घ्या.
त्यांनतर कढईमध्ये अर्धा चमचा तूप घाला. आणि त्यामध्ये घेतलेले ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ते हलकेसे भाजून घ्या.
आता खोबऱ्याचा किस आणि ड्रायफ्रूट्स थंड होऊ द्या.
खोबऱ्याचा किस थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी पिठीसाखर मिक्स करून घ्या. नंतर ड्रायफ्रूट्ससुद्धा मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात वेलची पूड घालून घ्या. अनेकजण यामध्ये खसखससुद्धा वापरतात. त्यासाठी खसखस आधी थोडीशी गरम करून घ्या आणि नंतर मिक्स करा. अशाप्रकारे बाप्पाचा आवडता प्रसाद खिरापत तयार आहे.





